मुंबई : कोणत्याही अटिशिवाय राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहिर केली आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी बॅंकांनी सहाकार्य करावे. तसेच कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची यादी बॅंकांनी सोमवारपर्यंत सादर करावी, असे निर्देश देतानाच चुकीची यादी सादर करणाऱ्या बॅंकावर कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंत्रालयात महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा आढावा घेतला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री जयंत पाटील, मंत्री अनिल परब, मुख्य सचिव अजोय मेहता, बॅंकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
ठाकरे म्हणाले, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी शासन आणि बॅंका यांनी समन्वय ठेवून बॅंकांनी शेतकऱ्यांच्या कर्जखात्याची अचूक माहिती वेळेत द्यावी.
30 सप्टेंबर 2019 नंतर 2 लाख रुपयेपर्यंतच्या अल्प मुदत पीककर्जावर कर्जमुक्तीचा लाभ मिळेपर्यंत व्याज आकारु नये, असे सांगून शेतकऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन ठाकरे यांनी केले. या सरकारला एक महिना होण्याच्या आत कर्जमुक्तीची ही महत्वाकांक्षी योजना आणली आहे. तेव्हा योजना प्रत्यक्ष अंमलात आणण्याचे काम यंत्रणेचे आहे. दिलेल्या वेळापत्रकानुसार ही योजना पूर्ण करा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
बॅंकांनी या योजनेची अंमलबजावणी पूर्ण होईपर्यंत जिल्हास्तरीय नोडल अधिकारी नेमावे. ज्या शेतकऱ्यांचे आधार क्रमांक कर्जखात्याला संलग्न नाहीत याची यादी तयार करुन त्यांच्या उपलब्ध भ्रमणध्वनी क्रमांकावर संदेश पाठवावा आणि कर्जखात्याचा तपशील सूचनाफलकावर आणि ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध करुन द्यावा, असे निर्देशही ठाकरे यांनी यावेळी दिले.
खरीप हंगामाआधी कर्जमुक्ती व्हायला हवी
शेतकऱ्यांना महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ वेळेत देण्यासाठी बॅंकांनी अचूक माहिती तत्काळ सादर करावी. खरीप हंगाम 2020 साठी शेतकऱ्यांना पीककर्ज घेण्यासाठी पात्र करणे गरजेचे आहे. त्यामुळे त्याआधी सर्व कर्जमुक्ती व्हायला हवी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.