पुणे – नातेवाईकावर गंभीर हल्ला करुन जंगलात लपून बसलेल्या तीघांना कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. यासाठी पोलिसांना सापळा रचून त्यांना चारही बाजूने घेरावे लागले होते. किस्मत चुटक्या शिंदे (21,येवलेवाडी), कश्यप चुटक्या शिंदे(19,रा.येवलेवाडी), भारत उर्फ मॅंगो चुटक्या शिंदे (36. येवलेवाडी) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
संबंधीत आरोपी वस्तीमध्ये एकत्र रहातात. त्यांनी त्यांच्या चुलत भावावर भांडणातून वार केले होते. यानंतर ते जंगलात पळून गेले होते. हा गुन्हा दोन दिवसांपुर्वी घडला होता. दरम्यान आरोपींचा शोध घेत असताना पोलिस नाईक कांबळे यांना आरोपी उंड्री येथील जंगलामध्ये लपून बसल्याची खबर मिळाली होती. त्यानूसार सहायक पोलिस निरीक्षक चेतन मोरे यांचे एक पथक तयार करुन जंगलात पाठवण्यात आले.
पोलिसांची चाहुल लागताच आरोपी पळूण जात होते. मात्र पथकाने त्यांना घेरून जेरबंद केले. त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी केलेल्या गुन्हयाची कबुली दिली. संबंधीत आरोपी हे शेळ्या-मेंढ्या पाळण्याचा व्यवसाय करतात.
ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड, पोलिस निरीक्षक महादेव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक चेतन मोरे, दिपक बर्गे, पोलिस कर्मचारी संतोष नाईक, सुरेश भापकर, अमित साळुंके, संजीव कळंबे, निलेश वणवे, गणेश आगम, हेमंत राऊत, ज्योतीबा पवार, किशोर वळे, विनोद कांबळे यांच्या पथकाने केली.