विसर्गात वाढ होण्याची शक्यता
भंडारदरातील पाण्याचे जलपूजन
जलसंपदाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी आज भंडारदरा येथे येऊन भंडारदरा धरणाच्या पाण्याचे जलपूजन केले. त्यांच्यासमवेत त्यांचे सहकारी शाखा अभियंता अभिजीत देशमुख व इतर सहकारी उपस्थित होते. त्यांनी या वेळेस श्रीफळ त्याचबरोबर पुष्पहार, पुष्पगुच्छ आणि खणानारळाने पाण्याची ओटी भरून जलपूजन केले. त्यावेळी सर्वांनी एकच आनंदाने जल्लोष केला.
अकोले – भंडारदरा व निळवंडे धरणाच्या पाणलोटामध्ये काल उसंत घेणाऱ्या वरुणराजाने काल रात्री व आज सकाळी मुसळधार वृष्टी केल्याने अधिक जमा होणारे दोन्ही धरणातील पाणी प्रवरा नदीपात्रात सोडले जात आहे. त्यामुळे या हंगामातील प्रवरा नदीला आलेल्या पुरामध्ये आजचा सर्वात मोठा पूर ठरला आहे. तर मुळा नदीतही आज जोराने विसर्ग सोडण्याचे काम सुरू होते.
प्रवरा नदी पात्रात सकाळी 21 हजार, त्यानंतर 22 हजार दुपारी 26 हजार व सायंकाळी 26 हजार 729 क्युसेकचा विसर्ग सोडला जात राहिल्याने प्रवरा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला गेला आहे. नदीपात्रात कुणीही जाऊ नये, नदीकाठच्या परिसरातील लोकांनी सुरक्षितस्थळी तातडीने जावे. अशा प्रकारचा दवंडी देण्याचा कार्यक्रम सकाळपासून सुरू राहिला. भंडारदरा धरणामध्ये आज दहा हजार 507 दशलक्ष घनफूट पाणीसाठा कायम ठेवून अधिक होणारे पाणी स्पिलवे आणि त्याच बरोबर टनेलद्वारे सोडले जात होते.
धरणाच्या लाभक्षेत्रातील कालव्यांमधून आणि ओझर येथील बंधाऱ्यावरून हे पाणी सोडले जात होते. भंडारदरा धरणातून सोडले जाणारे अधिकचे पाणी निळवंडे धरणात जमा होत राहिले. निळवंडेचाही विसर्ग वाढविण्यात आला. त्यामुळे या नदीवर असणारे मेहेंदुरी ते अकोले व कळस येथील जुना हे सर्व पूल पाण्याखाली गेले आहेत.
विशेष बाब म्हणजे या सर्वच नदीकाठच्या गावांमध्ये आलेल्या पुराला पाहण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.कळस येथे सर्व महिलांनी पुढे येऊन प्रवराची साडी अर्पण करून पूजा केली. तर इतरही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पूर पाहण्यासाठी गर्दी झाली होती. अकोले येथील स्मशानभूमी परिसर पुराच्या पाण्याने वेढला गेला आहे.
मुळा धरणाच्या पाणलोटात म्हणजे हरिश्चंद्रगड परिसरातही आज पावसाची बॅटिंग सुरू राहिली. त्यामुळे मुळा नदीचा पूर कायम टिकून राहिला होता. परवाच्या तुलनेने मात्र विसर्ग होण्याचे प्रमाण आज कमी होते. आज सकाळी हे प्रमाण 17243 व त्यात दुपारी वाढ होऊन 19 हजार पर्यंत हा विसर्ग वाढविण्यात आला होता. कोतूळ परिसरातील नागरिकांनीही पूर पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. अनेकांनी या पुरा बरोबरच मागील आठवणींना उजाळा दिला.
गेल्या चोवीस तासात झालेली पावसाची नोंद मिलीमीटरमध्ये पुढील प्रमाणे : घाटघर – 109, रतनवाडी -205, पांजरे -158, वाकी -120, भंडारदरा – 142, निळवंडे – 15, अकोले व आढळा 02, कोतूळ – 06