बारामती तालुक्‍यात पुराचा धोका कायम

डोर्लेवाडी – वीर धरणातून मंगळवारी पहाटे 1 लाख 10 हजार क्‍युसेकने विसर्ग नदीपात्रामध्ये सुरू होता. यामुळे नीरानदीला महापूर आल्याने बारामती तालुक्‍यातील नदीकाठच्या सोनगाव, सांगवी, मेखळी, घाडगेवाडी आदी गावे “जलमय’ झाली होती, त्यामुळे जनजीव पूर्णत: विस्कळीत झाले होते तर अनेक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात होते. तर सायंकाळी विसर्ग कमी झाला असून परिस्थिती पूर्वपदावर येत असली तरी बुधवारी (दि. 7) 94 हजार 480 क्‍युसेकने विसर्ग सुरूच असून पावसाचा जोर वाढल्यास हा वेग वाढण्याची शक्‍यता असल्याने पूराचा धोका कायम असल्याने नागरिकांनी सतर्कच राहवे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

मेखळी गावातील जवळजवळ 40 कुटुंबाच्या घरामध्ये नदीचे पाणी शिरले होते, यामुळे काही जणांचे संसार उपयोगी वस्तू पाण्यात वाहून गेल्या आहेत. वाड्या-वस्त्यांवरील अनेक घरांना पाण्याने वेढा दिल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे. तसेच अनेक पिकेदेखील पाण्याखाली गेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मेखळी येथील वीजपुरवठा करणाऱ्या सबस्टेशनला देखील पाणी पोहोचले आहे यामुळे नदीकाठच्या काही ठिकाणचा विद्युत पुरवठा देखील खंडित करण्यात आला होता. तर या 40 कुटुंबांना तात्पुरती व्यवस्था गावातील शाळा,
समाजमंदिर आदी ठिकाणी करण्यात आली आहे.

सोनगाव (ता. बारामती) येथील 15 कुटुंबाच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे यामुळे या पंधरा कुटुंबांतील 90 जणांना देखील सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे यामध्ये त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक रस्तेदेखील पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे. कऱ्हा नीरा नदीच्या संगमावर वसलेले सोनेश्‍वर मंदिर देखील पाण्याखाली गेले आहे यामुळे या मंदिराला देखील धोका निर्माण झाला आहे. घाडगेवाडी मधील दत्त मंदिर आणि अनेक घरे पाण्याखाली गेली आहेत. काही ठिकाणी तर बोटीच्या सहाय्याने लोकांना बाहेर काढण्यात आले अनेक कुटुंबाना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.

सध्या धरणक्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे त्यामुळे धरणातून विसर्ग कमी होईल. परिस्थिती नियंत्रणात आहे तसेच पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्यास प्रशासन सज्ज आहे. नागरिकांनी धोकादायक ठिकाणी सेल्फी काढण्यासाठी किंवा स्टंटबाजी करू नये.
– विजय पाटील, तहसीलदार, बारामती


वीर धरणातून सोमवारी व मंगळवारी मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग होत होता. त्यामुळे नीरा नदीने धोक्‍याची पातळी ओलांडली होती. यातून नदीकाठावरील गावांना अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे बारामती, इंदापूर तालुक्‍यातील नीरा नदीकाठी असलेल्या गावांची पाहणी केली. तसेच पूरग्रस्तांमध्ये नागरिकांचे झालेले नुकसान, शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांना सरकारकडून आर्थिक मदत लवकरात लवकर मिळावी यासाठी पंचनामे तातडीने करण्याच्या सूचना तहसीलदार यांना दिल्या आहेत.

– विश्‍वास देवकाते, अध्यक्ष, जिल्हा परिषद

Leave A Reply

Your email address will not be published.