मॉस्को – रशियाचे आपत्कालिन खात्याचे मंत्री येवगेनी झुनिचेव यांचे आर्क्टिक प्रदेशातील आपत्कालिन परिस्थित हाताळताना निधन झाले. एका व्यक्तीचे प्राण वाचवत असताना मंत्र्यांचा मृत्यू झाला असे मंत्रालयाने म्हटले आहे. मात्र या मंत्र्याचा मृत्यू नेमक्या कोणत्या परिस्थितीत आणि कोणत्या कारणामुळे झाला हे मात्र मंत्रालयाने स्पष्ट केलेले नाही.
आपत्कालिन मंत्रालयाच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार झिनिचेव हे सैबेरियातील क्रास्नोयार्स्क या भागातील दौऱ्यावर होते. रशियातील आर्क्टिक भागातील सात वेगवेगळ्या प्रदेशांचा सहभाग असलेल्या आपत्काल विषयीच्या सरावाचे उद्घाटन त्यानी केले.
हा सराव आज दिवसभर चालणार होता. या सरावाच्या ठिकाणी आलेले प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अलेक्झांडर मेलनिक यांना वाचवताना झिनिचेव यांचा मृत्यू झाला असे मंत्रालयाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
प्रत्यक्षात नेमके काय घडले होते आणि मेलनिक हा वाचू शकले की नाही, हे मात्र स्पष्ट केलेले नाही. व्हिडीओ चित्रिकरणात सहभागी झाले असताना एक कॅमेरामन पाण्यात पडला. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात झिनिचेवही पाण्यात पडले. यात दोघांचाही मृत्यू झाला, असे एका वृत्तसंस्थेने अनधिकृतपणे म्हटले आहे.