सिधुदुर्ग – रस्ते अपघातात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसते आहे. अनेक अपघात हे ड्रिंक अॅंड ड्राईव्ह आणि बेशिस्त वाहतुकीमुळे होत असतात. बेशीस्त वाहतुकीमुळेच काल रात्री एका दाम्पत्याचा मृत्यू झाला आहे.
आजगाव वाघबीळ येथे काल रात्री डंपरने चार दुचाकींना धडक दिली. या विचित्र अपघातात एका दाम्पत्याचा मृत्यू झाला असून इतर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, रेडीहून मळेवाडच्या दिशेने जाणाऱ्या डंपरने चार दुचाकींना धडक दिली. या विचित्र अपघातात मधुकर रेवाडकर (वय-52) आणि त्यांची पत्नी मधुमती रेवाडकर यांचा मृत्यू झाला. मधुमती यांचा जागीच मृत्यू झाला होता तर मधुकर यांना उपचारासाठी दाखल केल्यानंतर मृत घोषीत करण्यात आले. इतर तीघा जखमींवर शिरोडा उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच शिरोडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. या भागात वारंवार बेशिस्त वाहतुकीमुळे स्थानिकांना जीव मुठीत घेऊन राहावे लागते आहे. डंपर वाहतुकीला शिस्त लावावी, अशी मागणी संतप्त ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.