कालिया ये तो बडी नाइन्साफी हैं! तालुक्‍याची लोकसंख्या 4 लाख आणि आधार केंद्रे केवळ पाचच

पहाटेपासूनच केंद्रांवर लागताहेत रांगा : अपडेटसाठीही करावा लगतो 15 ते 30 किमीचा प्रवास

– अमोल गायकवाड

जुन्नर – आधारकार्ड हे प्रत्येकाच्या जीवानतील अविभाज्य घटक झाले आहे. त्यातही नुसते आधारकार्ड नाही तर मोबाइल नंबर, इमेल आयडी, पूर्ण पत्ता आदी गोष्टींनी परिपूर्ण असे अपडेट आधारकार्ड अनिवार्य आहे.

त्यामुळे जुन्नर तालुक्‍यात सध्या प्रत्येक जण कार्ड अपडेट करण्यासाठी आधार केंद्रांच्या चकरा मारत आहे. पण तालुक्‍यात अवघे पाचच केंद्र असल्याने पहाटेपासूनच या केंद्रांवर लांबच्या लांब रांगा लागत असल्याने नागरिकांची परवड होत आहे. त्यामुळे “आदमी चार लाख और आधार केंद्रे खाली पाच ये तो बडी नाइन्साफी हैं’, अशा मजेदार प्रतिक्रियाही नागरिक देत आहेत.

जुन्नर तालुक्‍याची लोकसंख्या अंदाजे चार लाख आहे; मात्र, या लोकसंख्येसाठी जुन्नर, ओतूर, बनकरफाटा, आळेफाटा आणि नारायणगाव या पाचच आधार केंद्रे आहेत. त्यामुळे कार्ड काढण्यासाठी आथवा अपडेट करण्यासाठी विद्यार्थी, नागरिक, महिला, ज्येष्ठांना 15 ते 30 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. तर केंद्रांवर असलेल्या रांगांमुळे नंबर कधी लागेल याची शाश्‍वती नसल्याने अनेकांना वारंवार हेलपाटे मारवे लागण्याचाही अनुभव आहे.

पेन्शन योजनेसाठी शासनाने आता पॅनकार्ड अनिवार्य केले असून त्याकरिता या निवृत्त जेष्ठांना आधारकार्ड पॅनकार्डास लिंक करावे लागते. मात्र, हे सहजासहजी आणि वेळेत होत नसल्यामुळे अनेकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

जुन्नर तालुक्‍यात नवीन आधार केंद्रे सुरू करावीत यासाठी सहा महिन्यांपूर्वीच जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव पाठविले आहेत.
– सचिन मुंढे, नायब तहसीलदार, जुन्नर

त्याचप्रमाणे या आधार केंद्रांवर एका दिवसात केवळ 20 ते 30 नागरिकांचे काम होत असल्यामुळे ग्राहकांना पुढील तारखांना बोलावले जाते. तर कधी सर्व्हर डाऊन झाल्यास नागरिकांचे हेलपाटे हे ठरलेलेच. त्यामुळे नाहक मनस्ताप नागरिकांना सहन करावा लागतो. तरी प्रशासनाने आधार सेवा केंद्र वाढवावेत, अशी मागणी सचिन चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते रिझवान पटेल यांनी केली आहे.

बॅंकांची कारणे ठरलेली, तर पोस्टातील कर्मचारी ट्रेनिंगला

जुन्नर शहरातील पोस्ट खात्यातील आधारसेवा बंद असून कर्मचारी ट्रेनिंग करीता गेले असल्याचे सांगण्यात आले. शासनाने अनेक बॅंकांना याबाबत निर्देश दिले असून त्यासाठी आवश्‍यक यंत्र समुग्रीही देऊ केली आहे.

मात्र, अपुरे मनुष्यबळ किंवा मशीन नादुरुस्त आहे, अशी कारणे बॅंका ग्राहकांना सांगताना दिसत आहे. परिणामी तहसील कार्यालयात असलेल्या आधारसेवा केंद्रावर ज्येष्ठ नागरिक,महिला तसेच विद्यार्थ्यांची गर्दी वाढत आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.