आळेफाटा – ऊस वाहतुकीच्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला इनोव्हा मोटारीने पाठीमागून भरधाव वेगाने धडक दिली. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला तर दोनजण गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवारी (दि. 19) रात्री आठच्या सुमारास नगर-कल्याण महामार्गावर गुळंचवाडी (जुन्नर) शिवारात घडली. संजय मारुती गगे (रा. नळावणे), असे अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव आहे. योगेश धोंडिबा आहेर, संदीप पोपट शिंदे, असे गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत आळेफाटा पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, नगर-कल्याण महामार्गावर गुळंचवाडी शिवारातून क्रांती शुगर फॅक्टरीकडे उसाने भरलेला ट्रॅक्टर (एम.एच 16 केव्ही 6486) विनानंबरच्या दोन ट्रॉली घेऊन जात होता. तर इनोव्हा गाडी नगरकडून आळेफाटा येथे जात होती. त्याचदरम्यान इनोव्हा गाडी ही ट्रॉलीला पाठीमागून जाऊन धडकली. जोरदार धडक बसल्याने इनोव्हा गाडीचा चक्काचूर झाला.
गाडीमधील संजय मारुती गगे यांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जखमींना आळेफाटा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले करण्यात आले. अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी मोटारचालक राहुल भास्कर हाडवळे यांच्याविरुद्ध आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ट्रॅक्टरच्या विनानंबर डबल ट्रॉलीला मागे रिफलेक्टर नसल्याने चालकाला अंदाज न आल्याने अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.