पुणे – पुणे सातारा रस्त्यावरील एका प्रतिष्ठित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत अतिशय घृणास्पद प्रकार घडला आहे. येथे प्राथमिक इयत्तेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर शाळेतील वरिष्ठ विद्यार्थ्यांकडूनच अत्याचार करण्यात येत होते. इतकेच नव्हे तर पालकांनी ही बाब शालेय प्रशासनाच्या लक्षात आणून दिली होती. मात्र, शालेय प्रशासनाने पोलिसांकडे धाव न घेता स्वत: प्रकरणाचा तपास करण्याचा प्रयत्न केला. यामुळे भडकलेल्या पालकांनी सोमवारी शाळेत तीव्र आंदोलन करत शालेय प्रशासनाचा निषेध केला.
दरम्यान पर्वती पोलीस ठाण्यात पॉक्सो आणि अँण्टी रॅगिंग कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये शाळेच्या मुख्यध्यापिकेसह काही मुलांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका महिला पालकाने पर्वती पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांचा सहा वर्षाचा मुलगा शाळेत शिक्षण घेत आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून त्याच्या शाळेतील काही मोठी मुले त्याला व त्याच्या शाळेतील इतर वर्गातील लहान मुलांना त्रास देत होती. त्यांच्या शरीराला हात लागणे, मानसिक त्रास देणे आणि कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली जात होती. ही बाब पालकांनी तसेच मुलांनी शाळेच्या मुख्याध्यापिकेच्या निदर्शनास आणून दिली होती.
मात्र, त्यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. दरम्यान सकाळी शाळेत मोठ्या प्रमाणात पालक आणि राजकीय संघटनांचे कार्यकर्ते जमा झाले होते. त्यांनी शाळेच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. संवेदनशिल विषय असल्याने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. दरम्यान अत्याचार करत असलेल्या एका विद्यार्थ्याची ओळख पटली आहे. या प्रकरणाचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक जाधव करत आहेत.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन मोठी मुले शौचालयात जाताना तसेच बाहेर उभी असलेली दिसत आहेत. सध्या पीडित मुलांकडेही विचारणा करण्यात येत आहे. – जयराम पायगुडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पर्वती पोलीस