अबाऊट टर्न : गायब

– हिमांशू

करोना संसर्गाच्या बाबतीत विनोदाची वेळ आता टळून गेलीय; पण या देशाची मातीच अशी की जिथे-तिथे विनोद पेरले जातात आणि उगवूनही येतात. आपल्या भोवताली असलेल्या या वातावरणामुळे आपली भीती कमी होते. त्यामुळेच कदाचित ही ईश्‍वरी योजना करण्यात आली असावी. आपल्याकडे कोणतीही वस्तू आणली, तरी तिची डुप्लिकेट अवघ्या काही दिवसांत तयार होते. डुप्लिकेट करता येणार नाही, असा दावा केलेल्या वस्तूची नक्‍कल तयार करणे हे तर संबंधितांना खुले आव्हानच वाटते आणि ते स्वीकारलंही जाते. ही बाब आपण नोटाबंदीच्या काळात अनुभवली. नोटाबंदीचा (अनेकांपैकी एक) उद्देश डुप्लिकेट नोटांना आळा घालणे हा होता. परंतु दोन हजार रुपयांची नवी नोट बाजारात येताच काही दिवसांच्या आत तिची डुप्लिकेट तयार झाली.

आपल्याकडे किमान काही अस्सल गोष्टी उरल्या आहेत की नाही, असा प्रश्‍न पडावा इतका नकली वस्तूंचा सुळसुळाट दिसतो. ब्रॅंड नेममध्ये थोडा बदल करून डुप्लिकेट माल राजरोस आपल्या गळ्यात मारला जातो. पण डुप्लिकेट करोना टेस्ट कुणी गळ्यात मारेल असे वाटले नव्हते. पण आपल्याच राज्यात असे महाभाग आढळले. स्वमालकीची प्रयोगशाळा आहे, एवढ्याच भांडवलावर काहींनी करोनाची तथाकथित चाचणी घेऊन रिपोर्ट बनवून देण्याचा “व्यवसाय’ सुरू केला; पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार वेळीच उघडकीस आला.

चाचण्यांच्या बाबतीत मोठी गंमत झाली ती मध्य प्रदेशातले कॉंग्रेसचे नेते दिग्विजयसिंह यांची. त्यांनी नमुना घेण्यासाठी लॅबच्या माणसाला घरी बोलावलं आणि तो माणूस येण्यापूर्वीच त्यांना मेसेज आला, “तुमचा नमुना मिळाला. आभारी आहोत. लवकरच तुम्हाला रिपोर्ट मिळेल.’ दिग्विजयसिंहांना भडकायला कारण मिळू देणं किती चुकीचं आहे, हे सगळ्यांना ठाऊक आहे. परंतु अशा गमतीजमती नेमक्‍या त्यांच्या बाबतीत व्हाव्यात, हा कळसच म्हटला पाहिजे. तिकडे राजस्थानात तर मोठी गडबड झाली. नकली टेस्ट वगैरे सोडा; तिथं विनापरवाना लस देणारं रॅकेट वगैरे सक्रिय आहे की काय, अशी भीती यंत्रणांना वाटू लागलीय.

एरवी लस ही काही चोरण्याची वस्तू नव्हे; परंतु जयपूरच्या सरकारी रुग्णालयातून करोना लसीचे तब्बल 320 डोस चक्‍क चोरीला गेलेत. अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हाही दाखल झालाय. लसीची चोरी होण्याची ही देशातील पहिलीच घटना आहे. लसींचा तुटवडा आहे, हे सर्वांना ठाऊक आहे. त्यावर राजकारणही खेळून झालंय. नेमका कुणामुळे हा तुटवडा जाणवतोय, या मुद्द्यावरून राजकीय मंडळींची एकमेकांवर यथेच्छ चिखलफेक करून झालीय. तुटवडा असलेल्या वस्तू जपून ठेवाव्या लागतात; अन्यथा त्या चोरीला जातात हेही बरोबर आहे. परंतु लसी कोण चोरणार?

खरं तर एक कोटीपेक्षा अधिक नागरिकांना लस देणारं राजस्थान हे देशातलं दुसरं राज्य ठरलंय. गेल्या काही दिवसांत दररोज सरासरी साडेचार लाख लोकांना तिथं लस दिली जातीय. सरकारी यंत्रणा गतिमान असतानासुद्धा लस “चोरून घेण्याची’ अवदसा कुणाला आठवली असेल? लसी चोरीला गेल्यात की नुसत्याच “गायब’ झाल्यात, हे तपासले पाहिजे असे काही “अनुभवी’ मंडळींना वाटतंय. थोडक्‍यात, चोरीचा तपास करण्यापेक्षा चोरीच्या उद्देशाचा तपास करणे महत्त्वाचे ठरणार आहे म्हणे!

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.