पुणे -गावोगावी भरणाऱ्या आठवडे मेंढपाळ बकरे, मेंढ्या विक्रीस घेऊन येतात. मात्र, करोनामुळे बाजार बंद झाला आहे. त्यामुळे बकरे, मेंढ्यांचा तुटवडा झाला असून मटणाच्या दरात वाढ झाली आहे. गेल्या आठवडाभरात दरात प्रतिकिलो 40 ते 60 रुपयांनी वाढ झाली असून सातशे ते साडेसातशे किलोने विक्री होत आहे.
गावोगावी भरणाऱ्या आठवडे बाजारातून होणारी आवक बंद झाल्याने मटण विक्रेत्यांना सहजतेने बकरे, मेंढी उपलब्ध होत नसल्याने दरात वाढ झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील अकलूज, लोणंद, नातेपुते, म्हसवड येथे बकरे, मेंढ्यांचा मोठा बाजार भरतो. तसेच, पुणे जिल्ह्यातील चाकण, घोडनदी, तळेगाव ढमढेरे, भिगवण, यवत, नगरमधील राशीन, सायखेडा येथील बाजार बंद असल्याने बकरे, मेंढ्यांचा तुटवडा जाणवत आहे. गेल्या पंधरा दिवसांत मटणाच्या दरात किलोमागे पन्नास रुपयांनी वाढ झाली आहे, अशी माहिती पुणे मटण दुकानदार संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांनी दिली.
बाजारात सध्या चिकन, मासळीचा तुटवडा जाणवत आहे. बर्ड फ्ल्यूमुळे कुक्कुटपालन व्यवसायावर परिणाम झाला होता. त्यामुळे कोंबड्यांची आवक कमी होत आहे. चैत्र महिन्यात गावोगावी भरणाजया यात्रेत मटणाला मागणी असते. निर्बंधामुळे मटण विक्रेत्यांना बकरे, मेंढ्या मिळवण्यात अडचण निर्माण झाली आहे, असेही त्यांनी सांगितले.