Entertainment : ‘आई कुठे काय करते’ ही मालिका सध्या लोकप्रिय ठरत आहे. या मालिकेतील कलाकारांच्या भूमिकेचे देखील कौतुक केले जाते. या मालिकेत यश हे पात्र साकारणारा अभिनेता अभिषेक देशमुख देखील घराघरात पोहचला आहे. या मालिकेत यशची भूमिका साकारल्यानंतर आता अभिषेक लवकरच एका मोठ्या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे अभिषेक प्रसिद्ध बॉलीवूड कलाकारासोबत स्क्रीन शेअर करणार आहे.
‘आईच्या गावात मराठीत बोल’ सिनेमात अभिषेक ‘थ्री इडियट्स’ फेम ओमी वैद्यबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. मालिकेनंतर आता पुन्हा एकदा अभिषेक मोठ्या पडद्यावर झळकणार असल्याने चाहते देखील खुश झाले आहेत. ‘आईच्या गावात मराठीत बोल’ या सिनेमाचा नुकताच ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये अभिषेकची झलक पाहायला मिळाली आहे.
View this post on Instagram
याआधी अभिषेक ‘सनी’ या हेमंत ढोमेच्या सिनेमात झळकला होता. यामध्ये त्याने ललित प्रभाकरचा मित्र म्हणजेच संतोष ही भूमिका साकारली होती. त्यानंतर आता अभिषेक पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावरुन प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. ‘आईच्या गावात मराठीत बोल’ हा धम्माल विनोदी चित्रपट येत्या 19 जानेवारी 2024 रोजी प्रदर्शनासाठी सज्ज होणार आहे. चित्रपटाचा नायक समर अर्थात ओमी वैद्य अमेरिकेतून भारतात आल्यावर अनपेक्षित वळणांचा प्रवास प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.
‘आईच्या गावात मराठीत बोल’ या चित्रपटात ओमी वैद्य व्यतिरिक्त संस्कृती बालगुडे, पार्थ भालेराव, विद्याधर जोशी, इला भाटे, किशोरी शहाणे, उदय टिकेकर, अभिषेक देशमुख, सुप्रिया विनोद, नेहा कुलकर्णी, ओंकार थत्ते, ध्रुव दातार, सायली राजाध्यक्ष सुधीर जोगळेकर हे कलाकार दिसणार आहेत. येत्या 19 जानेवारीला हा चित्रपट रिलीज होणार आहे.