पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार आज (शुक्रवार) ओबीसी प्रवर्ग (मागास प्रवर्ग महिला व पुरुष) आणि सर्वसाधारण महिला आरक्षणाची सोडत सकाळी 11 वाजता चिंचवड येथे होणार आहे. यावेळी 114 जागांसाठी सोडत होणार असून, या सोडतीकडे इच्छुकांसह माजी नगरसेवकांचे लक्ष लागले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक तीन सदस्यीय पद्धतीने होणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी 46 प्रभाग आहेत. नगरसेवक संख्या 139 जागा असून यामध्ये 70 महिला आणि 69 पुरूषांसाठी जागा राखीव आहेत. त्यात अनुसूचित जाती (एससी) 11 पुरुष 11 महिला अशा 22, अनुसूचित जमाती (एसटी) 2 महिला 1 पुरुष अशा 3, नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) 19 महिला 18 पुरुष अशा 37 आणि खुल्या गटासाठी 38 महिला 39 पुरुष अशा 77 जागा अशी वर्गवारी आहे.
महापालिकेने 31 मे रोजी ओबीसी आरक्षणाविना सोडत काढली होती. एससी, एसटी महिला आणि सर्वसाधारण (महिला) यांच्याकरिता सोडत काढण्यात आली होती. दरम्यान, 20 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण दिले. त्यामुळे सर्वसाधारण आरक्षण सोडत रद्द झाली आहे. सर्वसाधारण 114 जागांसाठी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आज (शुक्रवार) सकाळी 11 वाजता आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. ए-फोर साईजच्या कोऱ्या कागदावरुन आरक्षणाच्या चिठ्ठया तयार केल्या जातील. एका रंगाच्या रबरने त्या गुंडाळल्या जातील. पारदर्शक गोल डब्यामध्ये टाकून फिरविल्यानंतर शाळेतील मुलांच्या हस्ते आरक्षणाच्या चिठ्या काढल्या जातील.
सुरुवातीला ओबीसींच्या 37 राखीव जागांसाठी सोडत काढली जाईल. त्यानंतर या 37 जागांमधून महिलांसाठीच्या राखीव 19 जागांसाठी सोडत काढण्यात येईल. शेवटी सर्वसाधारण महिलांसाठीच्या 38 जागांची सोडत काढली जाईल. सर्वसाधारण पुरुषांसाठी 39 जागा असणार आहेत. दरम्यान, इच्छुकांचे सोडतीकडे लक्ष लागले आहे. अनेक माजी नगरसेवकांना याबाबतची चिंता सतावत आहे. त्यामुळे सोडत कार्यक्रमाला इच्छूकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यानुसार पालिकेच्या निवडणूक विभागाने चोख व्यवस्था केली आहे. आरक्षण सोडतीनंतर काही नगरसेवकांना अन्य प्रभागामध्ये संधी शोधावी लागेल अथवा कुटुंबातील महिलेला संधी
द्यावी लागणार आहे.
सर्वसाधारण पुरुषांसाठी 39 जागा
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक लढविण्यासाठी सर्वाधिक इच्छुक हे सर्वसाधारण पुरुष गटातील आहेत. या गटातून लढण्यासाठी मोठी स्पर्धा असली तरी या गटासाठी केवळ 39 जागा असणार आहे. त्यामुळे आजच्या सोडतीनंतर अनेकांचे राजकीय भवितव्य ठरणार आहे. यापुर्वी काढण्यात आलेल्या आरक्षणात मोठे बदल होण्याच्या शक्यतेमुळे सर्वसाधारण गटातून इच्छुक असणाऱ्यांमध्ये या सोडतीची मोठी धास्ती पहावयास मिळत आहे.
एससी, एसटीचे आरक्षण कायम!
एसीसी, एसटीचे आरक्षण कायम राहणार आहे. त्यात कोणताही बदल होणार नाही. अनुसूचित जातीसाठी (एससी) 22 जागा राखीव आहेत. त्यात 19, 41, 20, 18, 37, 43, 34, 24, 35, 11, 14 या प्रभागात महिलांसाठी 11 जागा राखीव झाल्या आहेत. तर, 2, 16, 17, 18, 22, 25, 29, 32, 37, 38, 39, 44, 46 या 11 जागा एससी पुरुषासांठी राखीव आहेत. तर, अनुसूचित जमाती (एसटी) महिलांसाठी 44, 41 राखीव झाली आहे. तर, प्रभाग क्रमांक 6 एसटी समाजातील पुरुषासाठी राखीव झालेला आहे.
=================