डेहराडून – आम आदमी पक्षाने (आप) सोमवारी उत्तराखंडसाठी दहा कलमी कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार, भ्रष्टाचाराचे उच्चाटन, मोफत दर्जेदार शिक्षण आणि वैद्यकीय उपचाराची हमी देण्यात आली आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी हरिद्वारमधील पत्रकार परिषदेत पक्षाच्या दहा कलमी कार्यक्रमाची माहिती दिली. उत्तराखंडमध्ये सत्तेवर आल्यास आप भ्रष्टाचाराचे संपूर्ण उच्चाटन करेल. ते कार्य केवळ आपच करू शकतो. इतर पक्ष ते करू शकत नाहीत. आतापर्यंत उत्तराखंडमध्ये सत्तेवर असणाऱ्या भाजप आणि कॉंग्रेसने फक्त राज्य लुटण्याचे काम केले. मात्र, आप जनतेसाठी प्रामाणिक पर्याय ठरू शकतो, असे ते म्हणाले.
आपच्या दहा कलमी कार्यक्रमातून रोजगार, मोफत वीज आणि चांगल्या रस्त्यांची ग्वाही देण्यात आली आहे. सर्व प्रौढ महिलांना दरमहा 1 हजार रूपये मानधन देण्याचे आश्वासन आपने दिले आहे. त्याशिवाय, रोजगार उपलब्ध होईपर्यंत बेरोजगारांना विशेष भत्ता देण्याचे सूतोवाच आपने केले आहे. उत्तराखंडमध्ये भाजप आणि कॉंग्रेस या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्येच टक्कर अपेक्षित आहे. त्या राज्यात आप कशी कामगिरी करणार याविषयी उत्सुकता आहे.