मुंबई – महागाईमुळे सध्या मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स अस्थिर असला तरी आगामी चार ते पाच वर्षात सेन्सेक्स एक लाखाचा टप्पा ओलांडून शकेल असे जेफरीज या जागतिक पातळीवरील शेअर बाजारांचे विश्लेषण करणाऱ्या संस्थेने म्हटले आहे.
या संस्थेचे जागतिक पातळीवरील शेअर बाजार गुंतवणुकीचे सल्लागार ख्रिस वूड यांनी आपल्या साप्ताहिक टिपणात भारतीय शेअर बाजाराच्या वाटचालीबाबत आशावाद व्यक्त केला. ख्रिस वूड यांनी सांगितले की, माझा हा अंदाज अनेकांना आक्रमक वाटत असला तरी एकूण परिस्थिती पाहता आगामी चार ते पाच वर्षात भारतीय शेअर निर्देशांक वेगाने वाटचाल करण्याची शक्यता आहे.
केवळ विकसित देशाच्या निर्देशांकांपेक्षा भारतीय निर्देशांक वाढणार नाही तर वेगाने विकसित होणाऱ्या देशापेक्षाही भारताचे निर्देशांक वाढत जातील. सध्या भारताची अर्थव्यवस्था जगात सर्वात जास्त वेगाने वाढणारी आहे. पुढील चार वर्षात यामध्ये फारसा फरक पडण्याची शक्यता कमी आहे.
भारताच्या वेगवान विकासाचे गृहनिर्माण क्षेत्र हे एक चांगले द्योतक ठरणार आहे. सात वर्षाच्या मंदीनंतर हे क्षेत्र आता वेगाने वाढत आहे. बऱ्याच राज्यातील मुद्रांक शुल्क वाढत असूनही घरांची विक्री वाढत असल्याचे त्यांनी सागितले. या सर्व घडामोडी एकूणच भारतीय अर्थव्यवस्था आगेकूच करीत असल्याचे द्योतक असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय कंपन्यांचा सर्वसाधारण नफा 19 ते 20 टक्क्यांनी वाढत जाण्याची शक्यता त्यांना वाटते.
महागाई अमेरिका आणि युरोपातील भांडवल सुलभतेमुळे निर्माण झाली आहे. मात्र भारताने महागाई रोखण्यासाठी स्थूल अर्थव्यवस्थेच्या पातळीवर उत्तम काम केले आहे. भारताला वाढणाऱ्या क्रुडच्या किमतीचा थोडा धोका आहे. मात्र भारताकडे तब्बल 634 अब्ज डॉलरचे परकीय चलन आहे. त्यामुळे भारत हे धक्के सहन करत आगेकूच करणार आहे.
म्युच्युअल फंडातील गुंतवणूक वाढली
अमेरिकेच्या दरवाढीमुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदारानी आतापर्यंत 4.8 अब्ज डॉलर काढून घेतले आहेत. हे खरे असले तरी मार्च महिन्यापासून म्युच्युअल फंडातील गुंतवणूक 9.3 अब्ज डॉलरघाली आहे. आगामी काळातही भारतातील गुंतवणुकीचा ओघ कायम राहणार असल्याचे ख्रिस वूड यांनी सांगितले