नवी दिल्ली – दिल्लीतील एम्स रुग्णालयाच्या एका सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्याच्या प्रकरणात आम आदमी पक्षाचे नेते सोमनाथ भारती यांना दिल्लीतील एका न्यायालयाने दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
त्याखेरीज त्यांना एक लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. तथापि कोर्टाने त्यांना जामीन मंजूर करून अटक होण्यापासून संरक्षण दिले असून त्यांना या निकालाविषयी हायकोर्टात अपील करण्यास संधी मिळावी म्हणून त्यांना हा जामीन मंजूर करण्यात आला आहे.
एम्स विरोधातील आंदोलनाच्यावेळी सोमनाथ भारती यांनी आपल्या तीनशे समर्थकांसह एम्सवर मोर्चा नेऊन त्यांची सुरक्षा भिंत जेसीबीचा वापर करून पाडून टाकली. ही घटना 9 सप्टेंबर 2016 रोजी घडली होती. त्यावेळी त्यांनी तेथील सुरक्षा रक्षकाला मारहाणही केल्याचा प्रकार घडला होता.
सरकारी सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यावर हल्ला करणे हा कायद्याने गुन्हा आहे. त्या अंतर्गत त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात भारती यांच्यावरील आरोप सरकारी पक्षाने पुराव्यानिशी सिद्ध केला आहे, असा निर्वाळाही कोर्टाने दिला आहे. भारती यांच्या अन्य सहकाऱ्यांना मात्र कोर्टाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले.