Prakash Jarwal – दिल्लीत २०२० मध्ये एका डॉक्टरने केलेल्या आत्महत्या प्रकरणात आम आदमी पक्षाचे आमदार प्रकाश जारवाल यांना न्यायालयाने झटका दिला आहे. डॉक्टरला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपात न्यायालयाने जारवाल यांना दोषी ठरवले आहे. | Prakash Jarwal
आजच्या निकालानंतर याबाबत माहिती देताना वकील रवि द्राल म्हणाले की चार वर्षांच्या प्रदीर्घ सुनावणीनंतर आजचा निकाल आला आहे. खटल्याच्या सुनावणीच्या काळात अनेक साक्षीदार उलटले होते. अनेकांचे जबाब चुकीचे सिध्द झाले होते. असे असूनही न्यायालयाने जारवाल यांना दोषी ठरवले आहे. मात्र आम्हाला न्यायप्रणालीवर पूर्ण विश्वास असून या निकालाला आम्ही दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान देणार आहोत अशी माहिती जारवाल यांच्या वकिलांनी दिली.
राउज ॲव्हेन्यू न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एम. के. नागपाल यांनी आमदार जारवाल यांना कलम ३०६ आणि १२० ब अंतर्गत दोषी ठरवले. राजेंद्र भाटी असे या प्रकरणातील आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव आहे. | Prakash Jarwal
चिठ्ठीत होता आमदाराचा उल्लेख
५२ वर्षीय डॉ. राजेंद्र यांनी १८ एप्रिल २०२० रोजी आत्महत्या केली होती. त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत आमदार जारवाल यांच्या नावाचा उल्लेख केला होता. डॉक्टरांचा टँकर सप्लायचा व्यवसाय होता. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या वसुलीसाठीच त्यांना त्रास दिला जात होता आणि त्यातूनच त्यांनी टोकाचे पाउल उचलले. आपल्याकडून बळजबरीने वसुली केली जात असल्याचा स्पष्ट उल्लेख त्यांनी केला होता. आमदार जारवाल यांनी मात्र त्यांच्यावरचे आरोप फेटाळले आहेत. | Prakash Jarwal