मुंबई – बॉलीवूड अभिनेता आमिर खानचा ‘थ्री इडियट्स’ आणि ‘पीके’ हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. या दोन्ही चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिराणी यांनी केले होते. या चित्रपटांमध्ये मुख्यभूमिकेत आमिर खान होते. या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. यानंतर पुन्हा एकदा आमिर आणि राजकुमार हिराणी एकत्र येणार आहेत. एका चरित्रपटावर हे दोघे काम करणार आहेत.
या चित्रपटात आमिर खान महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळत आहे. हिरानी यांनी ऐकवलेली एक कथा आमिरच्या पसंतीस उतरली, त्यानंतर आमिरने चित्रपटाला होकार दिला. या चित्रपटाच्या पटकथा लेखनाच्या प्रक्रियेलाही लवकरच सुरुवात होणार आहे. पुढच्या वर्षी सुरुवातीला या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होईल.
सध्या हिराणी हे त्यांचा आगामी चित्रपट ‘डंकी’च्या चित्रीकरणात व्यग्र आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून ते जवळपास चार-साडेचार वर्षांनी दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटात अभिनेता शाहरुख खान महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार तापसी पन्नू आणि विकी कौशल यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट 22 डिसेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
दरम्यान, लाल सिंग चड्ढा या चित्रपटाच्या अपयशानंतर आमिर खान निराश झाला होता. त्याने काही काळ पडद्यापासून दूर होण्याचा निर्णय घेतला होता. मात्र राजकुमार हिराणीकडून त्याला चित्रपटासाठी ऑफर आली आहे. यामुळे आता चाहतेही या दोघांंना पुन्हा एकत्र पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत.