पुणे : नांदेड सिटी मधील मंगल भैरव सोसायटी, अविनाश लगड युथ फाऊंडेशन आणि मंगल भैरव कोजागिरी समितीच्या वतीने महाशिवरात्री आणि शिवजयंती एकत्र साजरी करून एक अनोखा आदर्श घालून देण्यात आला आहे. महाशिवरात्री निमित्त रक्तदान शिबिर, महाप्रसाद तर शिवजयंती निमित्ताने छत्रपती शिवारायांची महती सांगणारे पोवाडे, तसेच महाराजांच्या आयुष्यावर आधारित व्याख्यानाचे आयोजन संपूर्ण दिवसभर करण्यात आले होते. विशेष म्हणजे या उपक्रमात सोसायटीच्या सुरक्षा रक्षकां पासून ते सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांसह लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक सर्वजण सहभागी झाले होते. अशा प्रकारचा उपक्रम पहिल्यांदाच आयोजित करण्यात आला असतानाही दोन्ही दिवशी नांदेड सिटी मधील सदस्यांनी त्याला मोठा प्रतिसाद दिला.
मंगल भैरव सोसायटी आणि मंगल भैरव कोजागिरी उत्सव कमिटीच्या वतीने महाशिवरात्री निमित्ताने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्या सोबतच शिवाजयातेचे औचित्य साधत सिंहगडावरून प्रताप दशवंत, संदीप भालेकर, विक्रांत माने,तेजस जगताप, अक्षय घाडगे, जयदीप देवरे, सागर हवळ निलेश हगवणे यांनी शिवज्योत आणली. सर्व सदस्यांनी या शिवज्योतीचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.अशा प्रकारे पहिल्यांदाच शिवाज्योत आणून सोसायटीच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली.
त्यानंतर श्रीकांत रेनके यांनी शिवाजन्माचा पोवाडा सादर करत वातावरणात जल्लोष भरला. तर इतिहास तज्ज्ञ संतोष शिंदे यांनी शिवचरित्रावर तर अकलूजकर मॅडम यांनी गड किल्ले संवर्धन या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. तर अविनाश लगड युथ फाऊंडेशन आणि सोसायटीच्या वतीने रक्तदान शिबिरही घेण्यात आले. त्याला युवक तसेच महिलांनी चांगला प्रतिसाद दिला. दरम्यान, सोसायटीच्या वतीने आयोजित या उपक्रमास अविनाश लगड यांचे विशेष सहकार्य लाभले. तर सर्व पदाधिकारी, सदस्याच्या संयोजनातून करण्यात आलेले हे उपक्रम नांदेड सिटी परिसरात लक्षवेधी ठरले.