पारनेर, (प्रतिनिधी) – श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील श्री संतश्रेष्ठ निंबराज महाराज विद्याधाम प्रशालेच्या आवारातील भले मोठे झाड वादळी वाऱ्यामुळे कोसळले.चौकोनी आकाराची प्रशालेची इमारत असून आवारात विद्यार्थ्यांना सावली मिळावी, यासाठी झाडे लावलेली आहेत.
पण ही जंगली झाडे आता खूप वाढलेली असून अधूनमधून त्याच्या फांद्या तुटून खाली पडतात. त्यामुळे ही झाडे धोकादायक बनली आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या बाबतीत अपघात होऊ शकतो.
बुधवारी संध्याकाळी देवदैठण परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. या जोरदार वादळात हे झाड उन्मळून पडले. उन्हाळयाची सुट्टी असली तरी निकालाचे कामकाज सुरूआहे. तसेच दहावीच्या विद्यार्थ्यांचे जादा तास सुरूआहेत. पण रात्रीच्या वेळी ही घटना घडल्याने अनुचित प्रकार टळला.
शाळेच्या आवारातील झाडे धोकादायक झाली असल्याने ती काढण्याची परवानगी मिळावी यासाठी वनविभागाला चार दिवसांपूर्वीच पत्र दिले. त्यांच्या परवानगीनंतर शाळेच्या आवारातील धोकादायक झाडे काढणार आहोत. नव्याने नियोजनबद्ध झाडे लावणार आहोत.- बाळासाहेब दहिफळे, मुख्याध्यापक