लंडन : निसर्ग सुद्धा अनेक वेळा अनोखे असे चमत्कार घडवत असतो. सर्वसामान्य जीवशास्त्रीय नियमांच्या विरोधात सुद्धा अनेक वेळा घटना घडत असतात. सर्वसाधारणपणे जुळी किंवा तिळी मुले होणे ही जरी वेगळी घटना नसली तरी दोन गर्भाशय असलेल्या महिलेने जेव्हा अशा दोन गर्भाशयातून जुळ्या मुलींना जन्म दिला तेव्हा मात्र ही घटना अतिशय अनोखी ठरते.
केलसी हेचर असे या 32 वर्षीय महिलेचे नाव असून युनिव्हर्सिटी ऑफ अल्बमा येथील हॉस्पिटलमध्ये तिने या दोन जुळ्या मुलींना जन्म दिला. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दोन्ही मुलींची जन्माची वेळ आणि दिवस वेगळी वेगळी होती. दोन्ही मुलींच्या जन्मामध्ये किमान 12 तासाचा फरक होता. केलसीने 19 डिसेंबरला रात्री नैसर्गिक पद्धतीने आपल्या पहिल्या मुलीला एका गर्भाशयातून जन्म दिला त्यानंतर 20 डिसेंबरला सकाळी तिच्यावर शस्त्रक्रिया करून दुसऱ्या मुलीचा जन्म झाला.
डॉक्टरनी दिलेल्या माहितीप्रमाणे, अशा प्रकारची घटना दहा लाख महिलांमध्ये एका महिलेच्या बाबतीतच घडू शकते. खरेतर लग्नानंतर चार वेळा कॅल्सी गरोदर राहिली होती पण तिचा गर्भ टिकला नव्हता. पाचव्यांदा जेव्हा ती पुन्हा गरोदर असल्याचे लक्षात आले तेव्हा डॉक्टरांनी तिची तपासणी केल्यावर तिच्या दोन्ही गर्भाशयांमध्ये दोन स्वतंत्र गर्भ असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
त्यामुळे तिची स्वतंत्र वेगळ्या प्रकारे काळजी घेण्यात आली. यापूर्वी प्रत्येक गरोदरपणात एकाच गर्भाशयात गर्भ राहिला होता पण यावेळी दोन्ही गर्भाशयात गर्भ असल्यामुळे डॉक्टरांनी विशेष काळजी घेतली. श्वेता पटेल नावाच्या भारतीय डॉक्ट ने तिची काळजी घेतली आणि याच डॉक्टरांच्या सहकार्याने तिने आपल्या दोन्ही मुलींना सुखरूपपणे जन्म दिला अनोख्या पद्धतीने जन्माला आलेल्या या दोन्ही मुलींची नावे रॉक्सी आणि रेबल अशी ठेवण्यात आली आहेत.