भरपावसात दुर्गंधीयुक्त पाण्याचे पाट

महापालिकेच्या कारभाराविषयी हडपसरमध्ये तीव्र संताप

पुणे/हडपसर – मुसळधार पावसाने हडपसरकरांची त्रेधातिरपीट उडाली.
पावसाळी भूमिगत गटारी पूर्णपणे तुंबल्याने संपूर्ण रस्ते पाण्याखाली गेले होते. गटारी व नाल्याचे सांडपाणी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर आल्याने दुर्गंधीयुक्त पाण्याचे पाट वाहू लागल्याने नागरिकांनी महापालिकेच्या कारभाराविषयी तीव्र संताप व्यक्त केला.

पीएमपी बस थांबा क्रमांक 111च्या बाजूला रामोशी आळीकडे जाणाऱ्या पंचवटी कॉम्प्लेक्स समोरील रस्त्यावरील पाण्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. ससाणेनगर रस्ता आणि रामोशी आळीकडे जाणारा रस्ता पाण्याचे मोठे तळे झाले होते. अनेकांच्या दुचाकी पाण्यात अडकल्याने त्या बाहेर काढणे अवघड झाले होते. तसेच पंधरा नंबर येथील मनिरत्न आंगण सोसायटी समोरील रस्त्यावरही तळे साचले होते.

मुसळधार पावसामुळे अनेक मार्गांवरील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती.पालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या या रस्त्यावर पाण्याचा तलाव साचून रस्ता वाहतुकीसाठी बंद झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. या भागात नागरिकांनी चेंबर खुले करून दिल्याने काही प्रमाणात पाणी कमी झाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.