कान्हे, दि. 15 (वार्ताहर) – मावळ तालुक्यातील कान्हेफाटा येथे दुर्मिळ पोवळा जातीचा विषारी सर्प आढळला. शुक्रवारी (दि.14) सायंकाळच्या सुमारास आढळलेल्या या सापाला वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सदस्यांनी सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडले.
कान्हेफाटा येथील एका घरात साप असल्याची माहिती वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य तुषार सातकर यांना मिळाली. तुषार सातकर यांसह यश बच्चे, निनाद काकडे, जिगर सोलंकी, प्रमोद ओव्हाळ यांनी त्याठिकाणी जाऊन पाहणी केली असता तो साप पोवळा जातीचा असून, विषारी साप असल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी सुरक्षितरित्या त्याला पकडले. याची माहिती वनविभाग, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश गराडे व अनिल आंद्रे यांना कळवली. त्यानंतर रेस्क्यु केलेल्या सापाला सुखरूपपणे जंगलात सोडले.
पोवळा या सापाविषयी
पोवळा हा वाळ्या सारख्या दिसणारा व वाळ्यापेक्षा काहीसा मोठा साप आहे. सापाची लांबी सरासरी 12 ते 15 इंच इतकीच असते. या सापाचे विष मज्जा संस्थेवर परिणाम करत असल्यामुळे चावल्यास सूज येणे, चक्कर येणे, बेशुद्ध पडणे असे परिणाम होतात. तसेच चावलेल्या भागात यातना होतात. 20 ते 30 मिनिटांनी श्वसन क्रियेत अडथळा येण्याची शक्यता असते.