कराड – येथील कृष्णा- कोयना नदीच्या प्रीतिसंगमावर पोहण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीवर मगरीने हल्ला केला. शुक्रवार दि. ४ रोजी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. हल्ल्यातील जखमी व्यक्तीला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलवले आहे. या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मधुकर लक्ष्मण थोरात (रा. कराड, वय ५०) असे मगरीच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कराड येथील कृष्णा कोयना नदीच्या प्रीतिसंगमावर कृष्णा नदीच्या पात्रात शुक्रवारी शुक्रवार दि. ४ रोजी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास मधुकर थोरात पोहण्यासाठी गेले होते.
नदीपात्रात उतरल्यानंतर मगरीने प्रथम त्यांच्या बोटांना पकडले. कशानेतरी आपला हात पकडण्याची बाब लक्षात येताच त्यांनी यांनी हात झटकून पाण्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न केला. परंतु, मगरीने लगेच त्यांचा पाय पकडला. त्यामूळे थोरात यांनी पायाला जोरात हिसडा मारून मगरीच्या तोंडातून आपला पाय सोडवत आरडाओरडा केला. तसेच नदीपत्रातून ओरडतच बाहेर आले.
यावेळी त्याठिकाणी जमलेल्या लोकांनी थोरात यांच्याकडे धाव घेतली. तसेच मगरीच्या हल्ल्यात जखमी झालेल्या थोरात यांना तात्काळ उपचारासाठी येथील स्व. वेणूताई चव्हाण शासकिय उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या घटनेमुळे प्रीतिसंगमासह कृष्णा व कोयना नदीकाठावरील गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.