मुंबई : राज्यातील सत्तांतरानंतर सतत चर्चेत असणारे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांचा पाय आणखी एकदा खोलात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण आमदार बांगर यांनी यावेळी चक्क एका पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात येत आहे. विशेष म्हणजे ज्या पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करण्यात आली आहे, त्याने याविषयी वरिष्ठांकडे लेखी तक्रार देखील केली असल्याचे समोर आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, 27 ऑक्टोबर रोजी आमदार बांगर आपल्या कार्यकर्त्यांसह गार्डन गेटवरून मंत्रालयात जात असताना, तिथे ड्युटीवर उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने त्यांना थांबून पासची विचारपूस केली. मात्र पासची विचारपूस केल्याने संतप्त झालेल्या आमदार बांगर यांनी संबधित पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याचा आरोप होत आहे.
तर अशा पद्धतीने “आता तू मला शिकवणार का?” असे म्हणत बांगर यांनी वाद घालून शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच संबधित पोलीस कर्मचाऱ्याने या घडलेल्या घटनेबाबत वरिष्ठांकडे लेखी तक्रार देखील केली आहे.
याबाबत एका वृत्तवाहिनीशी बोलताना आमदार बांगर म्हणाले की, “मी कोणतेही शिवीगाळ केली नाही. तसेच पोलीस कर्मचाऱ्यासोबत आपला कोणताही वाद देखील झाला नसल्याचे आमदार बांगर म्हणाले आहेत. मात्र आपण गार्डन गेटने गेलो होतो हे आमदार बांगर यांनी मान्य केले आहे.