कराड : परिसरात मॉर्निंग वॉक करणाऱ्या ७६ जणांवर सोमवारी पोलिसांनी लॉकडाऊन व संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली होती. त्यांना बुधवारी न्यायालयात हजार केले असता न्यायालयाने त्यांना प्रत्येकी एक हजार असा एकूण ७६ हजाराचा दंड ठोठावला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन व संचारबंदी आदेश जारी केले आहेत. मात्र, काही लोक सोशल डिस्टन्सिंगचे उल्लघंन करून पहाटेच्या वेळी मॉर्निंग वॉकसाठी रस्त्यावर फिरत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
त्यानुसार पोलिसांनी कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतील वाखाण रोड, शिवाजी स्टेडियम रोड, मुख्य रस्ता, सर्व पेठेतील गल्ली बोळ रोड, विद्यानगर, ओगलेवाडी, बनवडी, आगाशिवनगर, मलकापूर, कार्वेनाका अशा ठिकाणी वेगवेगळी पथके तयार करून कारवाई केली.