अंगणात दारी खडी अन्‌ सर्वांना भरली हुडहुडी!

भंडारदरा परिसरात पारा घसरून आला चार अंशांवर

अकोले  – तालुक्‍यात गुरुवारी (दि.16) सायंकाळपासून अचानक शीतलहर वाहू लागली. हवेत गारवा पसरू लागला.रात्रभर क्षणाक्षणाने यात वाढ होत गेली आणि आज सकाळी वातावरणातला निसर्गातला माहोलच बदलला. त्यामुळे ‘अंगणात उभी खडी, सर्वांना भरली हुडहुडी, अशी ही गुलाबी, झोंबणारी थंडी सर्व अकोले तालुक्‍याला गारठून गेली.

भंडारदरा येथे तब्बल चार अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. रब्बी हंगाम सुरू झाल्यापासून ज्या थंडीची सर्वजण वाट पाहात होते, ती थंडी आज पहिल्यांदा जाणवली. अकोले तालुक्‍यात सर्वदूर या थंडीचे शेतकरी वर्गाने स्वागत केले आणि सर्वसामान्य लोकांनाही या थंडीने आपल्या उबदार पांघरुणाचा शोध घेण्याची वेळ आणली.

आज भंडारदरा येथे चार अंश सेल्सिअस तापमानाची नीचांकी नोंद झाली. या हंगामातील थंडीने पहिलाच झटका जनजीवनाला दिल्याने ‘अवचित’ आलेली थंडी अधिक खाली जाणार की, त्यात बदल होणार, याची सर्वांनाच आता उत्सुकता आहे.
गुरुवारी सायंकाळपासूनच आकाश निरभ्र राहिले. निरभ्र आकाश, धुके पळालेले आणि चावरा वारा आणि हाडाला भीडणारी थंडी. त्यात वाहू लागलेल्या शीतलहरी यामुळे अकोले तालुक्‍याचे जनजीवन गारेगार होऊन गेले. रब्बी हंगामातील पिकांसाठी थंडीची शेतकरी प्रतीक्षा करत होते.

ती आज मात्र खऱ्या अर्थाने संपली. रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी, कांदा, टोमॅटो या पिकांना काळा मावा कवेत घेईल, अशी भीती तयार झाली होती. या बदलत्या स्थितीत ती भीती दूर होण्यास मदतच होणार आहे. या थंडीमुळे पिकांची निरोगी वाढ होऊन या पिकांबरोबरच डाळिंब, द्राक्ष व अन्य पिकांनाही याचा लाभ होणार आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे.

औषध फवारणी व ती ही खर्चिक करून बदलत्या निसर्गाच्या कॅनव्हासवर आपल्या हाती दोन पैसे लागतील काय? अशी भीती वाटत असतानाच हे वातावरण बदलले आणि शेतकरी वर्गात समाधान तर पसरले मात्र त्यामुळे आज या गुलाबी थंडीने सर्वांनाच हुडहुडीही भरली.

आजच्या या थंडीमुळे अचानक गाठोड्यात बांधलेले गरम कपडे सोडण्याची वेळ खरे तर काल रात्री पासूनच सुरू झाली. आज भंडारदरा येथे चार अंश डिग्री सेल्सिअस एवढी नीचांकी तापमानाची नोंद झाली, अशी माहिती जलविद्युत प्रकल्पाचे अभियंता नितीन वैद्य यांनी दिली. या हंगामातील ही सर्वांत नीचांकी तापमानाची नोंद आहे. निसर्गाच्या बदलत्या स्थितीमुळे ढगाळ वातावरण, पाऊस, धुके यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत आला होता. असे सांगून प्रवीण सातपुते यांनी या थंडीचे स्वागत केले आणि रब्बी पिकाला या थंडीचा निश्‍चित फायदा होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here