प्लॅस्टिक बंदी कारवाईला केला होता विरोध : व्यापाऱ्यांचा तडजोडीचा प्रयत्न फसला
नगर – प्लॅस्टिकबंदीची कारवाई करण्यास गेलेल्या महापालिकेच्या पथकाला अडथळा आणताना प्लॅस्टिकबंदीचा दंड भरण्यास नकार देणाऱ्या कापड बाजारातील मॅंगो डॉल कीड्स वर्ल्ड सुरेश राज पुरोहिती व मोटवानी सारीजचे पमनदास मोटवानी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.
या दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी-आयुक्त राहुल द्विवेदी यांनी दिले. यानुसार शनिवारी कोतवाली पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले. दरम्यान, महापालिकेच्या प्लॅस्टिकबंदी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी फिरणाऱ्या पथकाला दोन पोलिसांचे संरक्षण घेण्याच्याही सूचना द्विवेदी यांनी दिल्याने त्यानुसार यापुढे पोलीस बंदोबस्तात महापालिकेची प्लॅस्टिकबंदी दंड वसुली मोहीम राबवली जाणार आहे.
महापालिकेद्वारे मागील आठ-दहा दिवसांपासून प्लॅस्टिकबंदी मोहीम राबवताना प्लास्टिक साठा करणारे व्यापारी व दुकानदारांकडून प्रत्येकी 5 हजारांची दंड वसुली केली जात आहे. आतापर्यंत असा सव्वादोन लाखांवर दंड वसूल केला गेला आहे. या कारवाईसाठी फिरणाऱ्या पथकाच्या कारवाईत दोन व्यापाऱ्यांनी अडथळा आणला होता. व त्यांनी दंड भरण्यास नकार दिला होता. त्यानंतर पथकाने दोन्ही दुकानांचा पंचनामा केला व त्याचा अहवाल वरिष्ठांना दिला.
गुरुवारी सायंकाळी महापालिकेत घेतलेल्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी संबंधित दोन्ही व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार त्यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणण्यासह प्लॅस्टिक बाळगल्याचा गुन्हा शनिवारी दाखल करण्यात आला. 17 डिसेंबरला दुपारी साडेबारा ते सव्वादोनच्या दरम्यान महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक तुकाराम भांगरे, बाळासाहेब विधाते, सुरेश वाघ व राजेंद्र सामल हे पथकासह कापड बाजारात प्लॅस्टिकबंदीच्या दंड वसुली कारवाईस गेले होते.
त्या वेळी भिंगारवाला चौकात कारवाई करीत असताना 20 ते 25 जणांच्या जमावाने, ‘व्यापाऱ्यांनो पावती करू नका, हुसकावून लावा तसेच काय पंचनामा करायचा तो करू द्या,’ अशी वक्तव्ये केली व मोहिमेस मज्जाव केला. त्यामुळे त्या वेळी मोहीम थांबवावी लागली. याच मोहिमेदरम्यान मॅंगो डॉल कीड्स वर्ल्ड व मोटवानी सारीज या दुकान व्यावसायिकांची तपासणी केल्यावर तेथे सरकारने बंदी घातलेल्या नॉन ओव्हन बॅग्ज सापडल्या.
त्या जप्त केल्यावर संबंधित दुकानदारांना नियमानुसार 5 हजार रुपये दंडाची पावती भरण्याचे सांगितले. पण त्यांनी दंड भरण्यास नकार दिला. त्यामुळे पंचनामा केला. संबंधित व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करण्याचे तसेच यापुढे प्लॅस्टिकबंदी दंडात्मक कारवाईसाठी फिरणाऱ्या पथकासमवेत पोलिसांचे संरक्षण घेण्याचे आदेश त्यांनी दिले.