शिरवळ – शिंदेवाडी (ता. खंडाळा) गावच्या हद्दीमध्ये हॉटेल मांडवलीचे मालक मुरलीधर उर्फ दादासाहेब बबन सोनावणे (वय 52, रा. शिंदेवाडी) यांच्यावर अज्ञातांनी केलेल्या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे खंडाळा तालुक्यात खळबळ उडाली आहे.
घटनास्थळावरून व पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, शिंदेवाडी हद्दीमध्ये भोर- शिरवळ रस्त्यावर सोनावणे यांच्या मालकीचे हॉटेल मांडवली आहे. शनिवारी दि.21 डिसेंबर रोजी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास अज्ञात युवकांनी हॉटेललगत असणाऱ्या रूममध्ये खिडकीतून प्रवेश केला. आवाज झाल्याने दादासाहेब सोनावणे यांना जाग आली.
उठून पाहिल्यावर त्यांना रूममध्ये एक युवक दिसला. यावेळी सोनावणे यांनी विचारणा करताच त्या युवकाने रूमधीलच हॉकी स्टिकने त्यांच्यावर हल्ला केला. सोनावणे यांनी प्रतिकार करताना अचानक आणखी एका युवकाने खिडकीमधून आत प्रवेश करीत रूमधीलच कुऱ्हाडीने हल्ला चढवला. त्यालाही सोनावणे यांनी प्रतिकार केला. यावेळी झालेल्या झटापटीमुळे व प्रतिकारामुळे हल्ला करणाऱ्या युवकांनी घटनास्थळावरून पलायन केले.
पलायन करताना हल्लेखोर युवकाने खिडकीमधून उडी टाकल्याने खाली असलेल्या ब्लब फुटला. हल्लेखोरही जखमी झाला असण्याची शक्यता पोलीसांनी वर्तवली आहे. हल्लेखोरांनी साधारणपणे दोन मोबाइल असा 13 हजारांचा ऐवज लंपास केला. यावेळी गंभीर जखमी झालेल्या सोनावणे यांना शिरवळ येथील खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.घटनास्थळी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पाहणी केली. यावेळी पोलीस निरीक्षक उमेश हजारे, एलसीबीचे पथक, शिरवळ पोलीस हजार होते. सोनावणे यांच्यावरील हल्ला चोरीच्या की अन्य कोणत्या कारणातून झाला याबाबतचा तपास पोलीस करत आहेत.