धर (मध्य प्रदेश) : शिख विद्यार्थ्याला 12 वीच्या परीक्षेवेळी कॉपी प्रतिबंधात्मक पथकाने त्याची पगडी उतरवायला लावल्याची संतपाजनक घटना मध्यप्रदेशमधील धर येथे घडली. हरपालसिंग असे या विद्यार्थ्याचे नाव असून त्याच्या तक्रारीनंतर परीक्षा केंद्राच्या उपप्रमुखाला परीक्षे संबंधित कार्यातून मुक्त करण्यात आले.
धनमोद उच्च माध्यमिक विद्यालायात मी माझी परीक्षा देत होतो. मी परीक्षा वर्गात प्रवेश करताच मला माझी पगडी उतरवायला लावली. मी त्याला विरोध करण्याच प्रयत्न केला. मी केंद्र प्रमुखांकडे याची तक्रार केली. मात्र, मध्य प्रदेश शिक्षण मंडळाच्या नियमानुसार ते आवश्यक आहे, असे मला सांगण्यात आले. ही बाब माझ्यासाठी अत्यंत अवमानकारक होती. या प्रकारात निर्माण झालेल्या तणावामुळे मी माझी परीक्षा योग्य प्रकारे देऊ शकलो नाही, असे हरपालसिंगने जिल्हा प्रशासनाकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
धर जिल्हा आदिवासी विकास आयुक्त ब्रजेश कुमार यांनी अशी तक्रार आल्याचे मान्य केले. भरारी पथकाने कॉपीची तपासणी करताना त्याला पगडी उतरवण्यास सांगितले. सर्वच मुलांची त्यांनी तपासणी केली. तक्रारदार आणि संबंधितांचे जबाब घेण्यात आले. ही चौकशी पूर्ण होईपर्यंत केंद्र उपप्रमुख ममता चौरसिया यांना परीक्षा संबंधित कार्यातून मुक्त करण्यात आले आहे.
दरम्यान, धर जिल्ह्यातील शिख समुदायाने शिक्षण विभागाकडे हे प्रकरण नेले असून संबंधित शिक्षकाला निलंबित करण्याची मागणी केली आहे.