मोरगिरी (सातारा) – माहिती अर्जात दिल्याप्रमाणे माहिती दिली नसल्याच्या कारणावरून चिडून जाऊन तू माहिती कसा देत नाहीस ते बघतोच. नोकरी करायला आमच्या गावात बाहेरून आला आहेस. पाटणमध्ये भेट तुला दाखवतो, असे म्हणत जातीवाचक शब्द वापरून शिवीगाळ, धक्काबुक्की करत ग्रामसभेचे प्रोसिडींग फाडल्याप्रकरणी संशयित रवींद्र ज्ञानदेव मिसाळ (रा. किल्ले मोरगिरी) याच्यावर पाटण पोलीसात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याची तक्रार किल्ले मोरगिरीचे ग्रामसेवक चंद्रवदन दगा साळुंके (वय 28) यांनी पाटण पोलिसात दिली आहे. याबाबत पाटण पोलिसांनी दिलेली माहिती अशी, चंद्रवदन दगा साळुंके (मूळ रा. नंदुरबार, सध्या रा. विक्रमनगर, चाफोली रोड, ता. पाटण) यांनी आज दि. 24 मे रोजी सकाळी 11 वाजता किल्ले मोरगिरी येथील विठ्ठलाई मंदिरात विस्तार अधिकारी जयवंत दळवी यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेचे आयोजन केले होते. मात्र, कोरम अभावी ग्रामसभा तहकूब करून ती ग्रामसभा दि. 31 मे रोजी विठ्ठलाई मंदिरात घेण्यात येईल, असे सांगितले होते.
त्यानंतर ग्रामसेवक चंद्रवदन साळुंके हे विस्तार अधिकारी जयवंत दळवी यांच्यासोबत ग्रामपंचायत कार्यालयाजवळ बोलत होते. संशयित रवींद्र मिसाळ तेथे आले. यावेळी दळवी यांनी साळुंके यांना विचारले की मिसाळ यांना वित्त आयोगाची बॅंक स्टेटमेंटची माहिती का दिली नाही? यावर त्यांनी अर्जातील नमूद बॅंक स्टेटमेंटची माहिती दिली आहे, असे सांगितले.
तेव्हा रवींद्र मिसाळ याने मला वित्त आयोगाची माहिती हवी आहे, असे सांगितले. यावेळी मिसाळ याने तू मला माहिती कशी देत नाही ते बघतोच. मी बऱ्याच जणांची नोकरी घालवली आहे. तुला पण घरी घालवेन. पाटणमध्ये भेट तुला दाखवतोच, अशी दमबाजी करत अंगावर धावून येऊन हातातील ग्रामसभेचे प्रोसिडींग बुक हिसकावून घेतले. त्यातील लिहिलेली काही पाने अर्धवट फाडली. ग्रामसेवक चंद्रवदन साळुंके यांच्या शर्टची कॉलर पकडून शिवीगाळ करून धक्काबुक्की केली.
यावेळी तेथे उपस्थित असलेले पोलीस पाटील अमोल अवघडे, ग्रामपंचायत शिपाई सर्जेराव शिलवंत, ग्रामस्थ सखाराम राजाराम मोहिते, शंकर किसन लाड, लक्ष्मण किसन लाड, वामन बाळासाहेब अवघडे, मनोहर शंकर लाड यांनी त्यांची भांडणे सोडविली. याप्रकरणी ग्रामसेवक चंद्रवदन साळुंके यांनी संशयित मिसाळ याच्याविरूध्द पाटण पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार मिसाळ याच्या विरोधात पाटण पोलिसात शासकीय कामात अडथळा आणणे व जातीवाचक शिवीगाळ करणे या गुन्ह्याखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपअधीक्षक विवेक लावंड तपास करत आहेत.
गुन्हा दाखल झालेला संशयित हा भाजापचा पदाधिकारी असून त्याने काही काळ शेतकरी संघटनेचे पाटण तालुकाध्यक्ष पदही भूषवले आहे.