औरंगाबद – महिलेला मारहाण केल्याप्रकरणी वैजापूर येथील शिवसेना आमदार रमेश बोरणारे यांच्याविरोधात वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित महिला रमेश बोरणारे यांची भाऊजय असल्याची माहिती समोर येत आहे. भाजपच्या कार्यक्रमाला गेल्याचा राग मनात ठेवून रमेश बोरणारे यांनी त्यांच्या भाऊजयला मारहाण केल्याचे सांगितले जात आहे.
संबंधित महिला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या कार्यक्रमाला गेल्या होत्या. यामुळे रमेश बोरणारे, बोरणारे यांची पत्नी, भाऊ आणि इतर नातेवाईकांनी त्यांना मारहाण केल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. याप्रकरणी वैजापूर पोलिसांनी रमेश बोरणारे यांच्यासह 9 जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, बोरणारे यांचा पीए यांनी भांडण सोडवत असताना आपल्याला जातीवाचक शिवीगाळ केली म्हणून महिलेविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेनंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. “शिवरायांच्या महाराष्ट्रात वैजापूरचा शिवसेना आमदार रमेश बोरणारे यांनी भाजपच्या कार्यक्रमाला का गेली? असं म्हणत महिलेला बेदम मारहाण केली. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. परंतु, कोणतीही कारवाई झाली नाही. उलट पिडीतेवरच ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावर महिलाधोरणकर्ते काही बोलणार का ? अजून किती बलात्कारी व महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना वाचवणार आहात? असा प्रश्न उपस्थित करत चित्रा वाघ यांनी सीएमओला टॅग केलंय. महाराज असते तर या सरकारचा कडेलोट केला असता.हे सरकार गोरगरीबांचं धार्जीणं नाही तर सरकारचे कलाकारी मंत्री आमदार खासदार व त्यांच्या बगलबच्चे धार्जीणं आहे, अशा शब्दात त्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
आज म्हणे महिलाधोरणाचा मसुदा शिवरायांच्या चरणी अर्पण केलायं..
त्याचं
शिवरायांच्या महाराष्ट्रात वैजापूरचा शिवसेना आमदार रमेश बोरणारे ने भाजप च्या कार्यक्रमाला का गेली म्हणत महिलेला बेदम मारहाण केली..गुन्हा दाखल पण कारवाई शुन्य
उलट आज पिडीतेवरचं ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल…(१/२) pic.twitter.com/iqqvbAnb9t— Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar) (@ChitraKWagh) February 19, 2022
याप्रकरणी आमचे घरगुती प्रकरण आहे, असे आमदार बोरणारे यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला बोलताना सांगितले. दरम्यान, या प्रकारामुळे स्थानिक राजकारण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.