लखनऊ – उत्तर प्रदेशात हसनू राम या व्यक्तीने आतापर्यंत 93 वेगवेगळ्या निवडणुका लढल्यात. या सर्व निवडणुकांमध्ये त्याचा पराभव झालाय. मात्र तरीही त्याने 94 व्यांदा निवडणूक अर्ज करण्याची तयारी सुरु केलीय. या व्यक्तीला 100 वेळा निवडणुकीमध्ये परभूत होण्याचा विक्रम करायचाय.
हा विक्रम मला माझ्या नावावर करायचा आहे, असं हसनू सांगतात. 36 वर्षांपूर्वी एका मोठ्या पक्षाने हसनू राम यांना निवडणुकीचं तिकीट देण्याचं आश्वासन देत अंतिम क्षणी तिकीट नाकारलं होतं. हसनू राम यांच्या मनाला ही गोष्ट फार लागली. त्यानंतर तेव्हापासून ते सातत्याने निवडणुका लढवत आहेत.
हसनू राम पूर्वी राजस्व विभागामध्ये कार्यरत होते. मात्र निवडणुकांसाठी त्यांनी आपली नोकरी सोडली. नोकरी सोडल्यानंतरही त्यांना पक्षाकडून तिकीट मिळालं नाही. त्यानंतर त्यांनी महापालिका निवडणुकीपासून ते विधानसभा निवडणुकीपर्यंत सर्वच निवडणुका लढवण्यास सुरुवात केली.
15 ऑगस्ट 1947 रोजी जन्म झालेल्या हसनू राम हे अंबेडकरवादी आहेत. एका पक्षाकडे हसनू यांनी तिकीट मागितलं होतं. त्यावर त्या पक्षाच्या नेत्यांनी हसनू यांना तुला तर तुझा शेजारीही मत देणार नाही. तू निवडणूक लढून काय करणार?, असा प्रश्न विचारला होता. त्यानंतर पराभव पचवण्याची तयारी पाहिजे या उद्देशाने हसनू हे प्रत्येक निवडणूक लढवू लागले आणि त्यात पराभूत होऊ लागले.