नगर, (प्रतिनिधी) – केडगाव लिंकरोड परिसरातील गायके मळ्यात पुन्हा बिबट्याचा वावर आढळून आला आहे. त्यामुळे वन विभागाकडून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आला आहे.
केडगाव येथील दोन दिवसांपूर्वी दिसलेले बिबट्याचे ठसे हे लिंक रोडवरील शेख वस्तीच्या शेजारील ओढ्यालगतच्या रस्त्यावर दिसून आले होते. त्यामुळे शिवाजी विश्वनाथ गायके यांच्या शेतात, तसेच आसपासच्या वस्त्यां मध्ये गेल्या चार-पाच दिवसांपासून बिबट्या व त्याचे पिल्ल वावरताना नागरिकांना दिसून आले आहे.
या बिबट्याने परिसरातील वस्त्यांमधील चार-पाच कुत्र्यांचा फडशा पाडला आहे. त्यामुळे येथील नागरिक भीतीच्या सावटाखाली आहेत. वन विभागाने लवकरात लवकर बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. यापूर्वीही या भागातील विहिरीत मृत बिबट्या आढळून आला होता.