एक जण पळून जाण्यात यशस्वी
लोणावळा – येथील भांगरवाडी विभागात एका बंद फ्लॅटमध्ये चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांपैकी एका चोराला पाठलाग करून मुद्देमालासह रंगेहाथ पकडण्यात लोणावळा शहर पोलिसांना यश मिळाले. तर दुसऱ्या चोराची माहिती मिळवून त्याचा शोध घेण्यात आला आहे.
आकाश बाळू ननावरे (रा. सिंहगड रोड, पुणे) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. सुजित शेळके असे पळून गेलेल्या चोरट्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री भांगरवाडी, लोणावळा येथे रात्री साडेबाराच्या सुमारास एका बंद फ्लॅटमध्ये चोर शिरले असल्याचा फोन लोकेश राणे यांनी लोणावळा पोलिसांना केला.
ठाणे अंमलदार पोलीस हवालदार बाचल यांनी तत्काळ ही माहिती रात्र गस्तीवर असणारे पोलीस उपनिरीक्षक मृगदीप गायकवाड यांना दिली. माहिती मिळताच गायकवाड यांच्यासह पोलीस हवालदार प्रकाश सामील, पोलीस शिपाई जयराज देवकर, चालक पोलीस हवालदार भरत मोरे, होमगार्ड मराठे घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान चोरट्यांना गाडीचे आवाजाची चाहूल लागली व त्यांनी तेथून पळ काढला.
चोरटे पळून जात असता पोलिसांच्या दृष्टीस पडले. पोलिसांनी तत्काळ त्यांचा पाठलाग केला. यात एका चोरट्याला पकडण्यात पोलिसांना यश आले, परंतु दुसरा चोरटा अंधाराचा फायदा घेऊन पसार होण्यात यशस्वी झाला. जेरबंद करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आकाश बाळू ननावरे (रा. सिंहगड रोड, पुणे) असे असून पळून गेलेल्या चोरट्याचे नाव सुजित शेळके असे आहे. हे दोघेही रेकॉर्ड वरील घरफोडी करणारे अट्टल गुन्हेगार असून, ननावरे यांच्याविरोधात 12 ते 13 गुन्हे दाखल आहेत. फरार सुजित शेळके हा मोक्कामधील आरोपी असल्याची माहिती मिळत आहे. अटक चोरटा ननावरे यांच्याकडून चोरीस गेलेला 12 हजार 624 रुपयांचा माल हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.