मुर्शिदाबाद – बीएसएफच्या जवानाने सहकाऱ्याची गोळ्या घालून हत्या करत स्वत:ही आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे घडली आहे. पंजाबमधील अमृतसर येथे रविवारी अशीच एक घटना घडली होती. ही घटना ताजी असताना अशाचप्रकारची पुनरावृत्ती मुर्शिदाबाद येथे घडली आहे. या घटनेनंतर सुरक्षा दलात एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेबाबत सविस्तर वृत्त असे की, मुर्शिदाबादमधील कॅम्पमध्ये एका जवानाने सहकाऱ्यावर फायरींग केली त्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर हल्लेखोर जवानाने स्वतःवरही गोळी झाडून घेत आत्महत्या केली. भारत-बांगलादेश सीमेपासून काही अंतरावर असलेल्या जलांगी येथे 117 बटालियन कॅम्पमध्ये ही घटना घडल्याचे सांगण्यात आले. मृत जवान छत्तीसगड आणि तामिळनाडू येथील रहिवासी आहेत. या घटनेचे कारण अद्याप समोर आले नाही. याप्रकरणी बीएसएफचे वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस दलाकडून अधिक तपास केला जात आहे.