सातारा – शिरवडे (ता. कराड) येथील ओंकार दत्तात्रय माने (वय १४) या मुलाचा बुडून मृत्यू झाला. याबाबत पोलीस व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार ओंकार माने आपल्या चार मित्रांसोबत दुपारी अडीचच्या सुमारास कृष्णा नदीवरील पुलाजवळ पोहण्यास गेला होता.
थर्माकोलच्या आधारे पोहण्याचा प्रयत्न करणाऱ्या ओंकारचा थर्माकोल सुटल्याने त्याचा कृष्णा नदी पात्रात बुडून मृत्यू झाला. यावेळी त्याच्या सोबत असणाऱ्या मित्रांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो सापडला नाही. घाबरलेल्या मुलांनी याबाबतची माहिती आपल्या पालकांना दिली. यानंतर उंब्रज येथील पाणबुड्यांच्या सहाय्याने ओंकारचा शोध घेण्यात आला. मात्र दीड तासाच्या प्रयत्नानंतर त्याचा मृतदेह आढळून आला.
नदीपात्रात मुलगा बुडाल्याची बातमी गावात वार्यासारखी पसरली. यावेळी नागरिकांनी कृष्णा पुलावर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. आपल्या एकुलत्या एक मुलाचा मृतदेह पाहिल्यानंतर ओंकार च्या कुटुंबीयांनी फोडलेला हंबरडा काळीज पिळवटून टाकणारा होता. घटनेची नोंद तळबीड पोलीस स्टेशन येथे झाली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार काळे करत आहेत.