पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात जिल्ह्यातील विविध प्रकल्पांना झुकते माप देण्यात आले आहे. याचसह ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठीही भरीव तरतूद केली आहे. एकंदरच अर्थमंत्री असल्याने तिजोरीच्या चाव्या पवारांच्या हाती असल्याने त्यांनी निधीचा बूस्टर देत जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देत झुकते माप दिल्याचे दिसून येत आहे.
पुणे रिंगरोडच्या भूसंपादनासाठी 10 हजार 519 कोटींची निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे रिंगरोडच्या पूर्व भागाच्या भूसंपादनास गती मिळणार आहे. तसेच वडज (ता. जुन्नर) येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवनेरी संग्रहालय उभारण्याची घोषणा पवार यांनी केली आहे.
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान स्थळ तुळापूर, ता. हवेली व समाधी स्थळ वढू बुद्रुक तालुका शिरूर येथील स्मारकास 270 कोटी रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला असून काम सुरू असल्याचे पवार यांनी सांगितले.
लोणावळा येथे जागतिक दर्जाचा स्कायवॉक प्रकल्पासाठी 333 कोटी 56 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. संगमवाडी, येथे लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारकासाठी निधी मंजूर केला आहे.
हुतात्मा श्री शिवराम हरी राजगुरु जन्मस्थळ परिसर विकासासाठी 102 कोटी 48 लाख रुपयांचा आराखडाअंतर्गत निधी मंजूर केला आहे. तर एकवीरादेवी मंदिर, पुणे तीर्थक्षेत्र विकास प्राधिकरणांची स्थापना करण्याची घोषणा पवार यांनी अर्थसंकल्पात केली.