पुणे, {प्रभात वृत्तसेवा}: महापालिकेकडून वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी गर्दीच्या ठिकाणी मोबाईल स्वच्छतागृहे उभारली होती. याशिवाय अधिकारी आणि राजकीय नेत्यांची उपस्थिती असलेल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी दिवसाला तब्बल २५ हजार रुपये भाडे असलेले व्हीआयपी टाॅयलेट उपलब्ध करून दिले, असे दाखवून मोठया प्रमाणात स्थायी समितीत बिले ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे.
या प्रकारानंतर महापालिकेने या स्वच्छतागृहांची माहिती पुन्हा संकलित करून सुधारीत बिले सादर करावीत, असे आदेश दिले आहेत, तसेच या प्रकरणाची चौकशी करून आणि खातरजमा करूनच बिले दिली जाणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डाॅ. कुणाल खेमणार यांनी दिली.
महापालिकेकडून शहरात गर्दीच्या ठिकाणी फिरत्या स्वच्छतागृहांची व्यवस्था केली जाते. पालखी, गणेशोत्सव, मेळावे, बचत गटाचे कार्यक्रम, धार्मिक उत्सव, मिरवणुका अशा वेळी ही व्यवस्था केली जाते. त्यासाठी महापालिका ठेकेदाराला प्रतिदिन ११०० रुपये भाडे देते, तर काही कार्यक्रमासाठी मागणी अथवा गरज नसतानाही प्रतिदिन तब्बल २५ हजार रुपये भाडे असलेले एका सीटचे व्हीआयपी टाॅयलेटही ठेवले जाते.
घनकचरा व्यवस्थापन विभागाने अशा प्रकारे शहरात ७४ वेळा वापरलेल्या व्हीआयपी टाॅयलेटचे सुमारे १८ लाख ५० हजारांचे बिल स्थायी समितीत ठेवले आहे. त्यात पाच ठिकाणी ही टाॅयलेट ठेवल्याचे दाखविण्यात आले असले, तरी प्रत्यक्षात २ ठिकाणीच ही स्वच्छतागृहे ठेवली असून, उर्वरीत ठिकाणांची बिले लावली आहेत.
ही बाब माध्यमांनी समोर आणल्यानंतर जाग आलेल्या प्रशासनाने स्थायी समितीमधील हा प्रस्ताव थांबविला असून, पुन्हा एकदा अहवाल मागविण्यात आला आहे. त्यानुसारच पुढील बिले दिली जाणार आहेत. त्यामुळे महापालिकेचे मोठे आर्थिक नुकसान टळणार आहे.
फिरती स्वच्छतागृहे जेवढी मागणी आहे, त्यानुसार कार्यक्रमाच्या ठिकाणी ठेवणे आवश्यक आहे. या बिलांची योग्य पद्धतीने तपासणी केली जाईल. न केलेल्या कामाचे पैसे दिले जाणार नाहीत. त्याबाबत संबंधित विभागास सूचना करण्यात आल्या आहेत. – डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त, महापालिका