पाचगणी, (प्रतिनिधी) – मालमत्ता कराचा भरणा करण्यासाठी पाचगणी पालिका प्रशासनाने वेळोवेळी आवाहन करूनदेखील करभरणा न करणार्या थकबाकीदारांच्या नावांचा फलक पालिकेने छत्रपती शिवाजी महाराज चौकात लावला आहे. हा फलक पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.
शहर हद्दीतील मिळकतींच्या कराची शंभर टक्के वसुली मार्चअखेर करण्याचे उद्दिष्ट पालिका प्रशासनाने ठेवले आहेत. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मुख्याधिकारी निखिल जाधव, अधिकारी आणि कर्मचारी प्रयत्न करत आहेत. शहरातील अनेक नागरिकांकडे कोट्यवधी रुपयांची कराची थकबाकी असून, त्याचा तात्काळ भरणा करण्याचे आवाहन पालिकेतर्फे वेळोवेळी करण्यात आले.
वसुली विभागाच्या वाहनावर ध्वनिक्षेपक लावून, नागरिकांना कर भरण्याचे आवाहन केले जात आहे. थकबाकी वसुलीपोटी पालिका प्रशासनाने काही मालमत्ता सील केल्याचे समजते. वेळोवेळी कारवाई करूनही काही मालमत्ताधारक करभरणा करत नसल्याने पालिकेतर्फे आता थकबाकीदारांच्या नावांचा फलक छत्रपती शिवाजी महाराज चौकात लावण्यात आला आहेत.
यामध्ये थकीत कर भरण्यासाठी मालमत्ताधारकांना मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर संबंधित मालमत्ता जप्त करून, त्यांचा लिलाव केला जाणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.
या फलकावर फक्त 50 हजार रुपयांहून अधिक रक्कम थकीत असलेल्या मालमत्ताधारकांची नावे आहेत. यामध्ये अनेक नागरिक व व्यावसायिकांचा समावेश आहे. अजूनही वेळ गेलेली नसून, थकबाकीदारांनी तातडीने आपली येणे बाकी पालिका कार्यालयात येऊन भरावी, अन्यथा या मिळकती सील कराव्या लागतील. – मुख्याधिकारी निखिल जाधव