गाजलेल्या खेळाडूंवर बायोपिक बनणे ही काही बॉलीवूडसाठी नवीन बाब राहिलेली नाही. सचिन तेंडुलकर, धोनी, अझहरुद्दीन आदींचे बायोपिक होऊन गेले आहेत. आता प्रिन्स ऑफ कोलकाता अर्थात सौरव गांगुलीवरही बायोपिक बनवण्याची तयारी सुरू झाली आहे. आपल्यावरील बायोपिकसाठी दादाने “एनओसी’ दिली आहे, असे समजते आहे.
स्वतः सौरव गांगुलीनेच ही माहिती दिली आहे. हा सिनेमा हिंदीतच होईल. पण याचे डायरेक्शन कोण करणार आहे, हे आपण आताच सांगू शकणार नाही. कारण बाकीचा तपशील निश्चित होईपर्यंत आणखीन काही दिवस थांबायला लागेल, असेही गांगुलीने म्हटले आहे.
गांगुलीच्या प्रमुख रोलसाठी रणबीर कपूरचे नाव विशेष चर्चेत आहे. तर एका आणखीन रिपोर्टनुसार हृतिक रोशन हा रोल करणार आहे. पण या दोन्हीपैकी कोणत्याही वृत्ताचे अधिकृत समर्थन केले जाऊ शकलेले नाही.
हा बायोपिक धर्मा प्रॉडक्शन बनवणार असल्याचेही समजले आहे, मात्र त्याबाबतही स्पष्टता नाही. या बायोपिकसाठी सर्वात अगोदर एकता कपूर आणि फॉक्स स्टार स्टुडिओने गांगुलीशी संपर्क साधला होता. पण तेंव्हा गांगुलीने हा प्रस्ताव फेटाळून लावला होता. मात्र आता हा बायोपिक होणार हे मात्र निश्चित झाले आहे.