हॉटेल व्यवसायीकास अवघ्या 19 वर्षाच्या गुन्हेगाराची धमकी
पुणे – शहरातील बाल गुन्हेगाराची प्रश्न गंभीर बनत चालला आहे. बालगुन्हेगारांना मुख्य प्रवाहात वेळीच न आणल्यास ते पुढे सराईत गुन्हेगार बनत आहेत. अशीच एक घटना येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. एकेकाळच्या बाल गुन्हेगाराने एका हॉटेल व्यवसायीकास दरमहा हप्ता न दिल्यास ” जिस दिन मिलेगा, उस दिन तेरी मुंडी अलग करते पोलीस स्टेशन भेजुंगा’ अशी धमकी मोबाईलवर रेकॉर्ड करुन दिली. या गुन्हेगाराचे वय फक्त 19 वर्षे इतके आहे. अल्पवयीन असताना त्याच्यावर दोन गुन्हे दाखल होते.
रितेश विशाल पवार(19,रा.वडगाव शेरी) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका 41 वर्षीय हॉटेल व्यवसायीकाने फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे वडगाव शेरी येथे नेहा नावाचे हॉटेल आहे. तेथे आरोपी अल्पवयीन असल्यापासून फुकट जेवायला येत होता. जेवण झाल्यावर तो पैसे न देता दमदाटी करत असे. यामुळे त्याला घाबरुन हॉटेल मालकही त्याला आजवर फुकट जेवण देत होता. मात्र त्याचा त्रास वाढू लागल्याने फिर्यादी त्यास जेवण देण्यास टाळाटाळ करत होता. याचा राग मनात येऊन आरोपीने फिर्यादीला फुकट जेवणाबरोबरच आता दरमहा पाच हजार हप्ताही द्यावा लागेल अशी धमकी दिली. हप्ता न दिल्यास स्वत:च्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेईल असा दमही दिला. दरम्यान शनिवारी आरोपी रितेश पुन्हा हॉटेलमध्ये आला. तेव्हा फिर्यादी नसल्याने त्याने हॉटेलमधील कर्मचाऱ्याचा मोबाईल घेतला. त्यामध्ये व्हिडीओ रेकॉर्डिंग करून फिर्यादीचे नाव घेत शिवीगाळ करुन “जिस दिन तु मुझे मिलेगा, उस दिन तेरी मुंडी अलग करके पोलीस स्टेशन भेजुंगा’ अशी धमकी दिली. हॉटेलमधील कर्मचाऱ्याने हे रेकॉर्डींग फिर्यादीला दाखवल्यावर फिर्यादीने येरवडा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक बलभिम ननवरे करत आहेत.