शारजा – चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने मुंबईविरुद्धच्या सामन्यानंतर हार्दिक व कृणाल पंड्या यांना आपली जर्सी भेट दिली. त्याच्या याच कृतीमुळे आता यंदाची आयपीएल स्पर्धा धोनीसाठी अखेरची स्पर्धा ठरणार असल्याचे बोलले जात आहे.
तसे पाहिले तर धोनीने या स्पर्धेच्या गेल्या 12 वर्षांच्या इतिहासात अनेक खेळाडूंना आपली जर्सी भेट दिली आहे. मात्र, त्यावेळी चेन्नईचा संघ यशस्वी कामगिरी करत होता. यंदा मात्र, त्यांच्या संघाला प्ले-ऑफही गाठता आलेला नाही. त्यामुळे धोनीची ही कृती त्याच्या आयपीएलमधील निवृत्तीचे तर संकेत नाही ना अशी शंका व्यक्त केली जात आहे.
यंदाच्या स्पर्धेत धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नईला 11 पैकी 7 सामने गमवावे लागले आहेत. तसेच धोनीच्या खेळाबरोबरच त्याच्या नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यातच त्याने आपली जर्सी पंड्याबंधूंना भेट दिल्यामुळे नवी चर्चा सुरू झाली आहे.
गेल्या ऑगस्टमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहिर केल्यानंतरही पुढील किमान दोन ते तीन वर्षे आयपीएल खेळतच राहणार असल्याचे सुतोवाच धोनीने केले होते. मात्र, यंदाच्या स्पर्धेतील अत्यंत दारूण कामगिरी पाहता त्याने याही स्पर्धेतून बाहेर पडण्याचे तर ठरवले नसेल ना अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.