दुबई – ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचाही समावेश व्हावा यासाठी आयसीसीने पुन्हाएकदा प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी संलग्न देशांच्या क्रिकेट मंडळांकडून याबाबतची भूमिका तसेच अहवाल आयसीसीने मागवला आहे.
क्रिकेटच्या ऑलिम्पिकमधील पुनरागमनासाठी आयसीसीने गेल्या 10 ते 12 वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला आहे. मात्र, त्याला अद्याप यश आलेले नाही. जपानमध्ये पुढील वर्षी टोकियो ऑलिम्पिक होत आहे. त्यावेळी शक्य होणार नसले तरीही त्यानंतरच्याऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचाही समावेश असावा यासाठी आयसीसीकडून चाचपणी सुरू आहे. दोन वर्षांपूर्वी आयसीसीने याबाबत घेतलेल्या चाचणीत तब्बल 87 टक्के क्रीडा रसिकांनी क्रिकेटचाही ऑलिम्पिकमध्ये सहभाग असावा, अशी मते व्यक्त केली होती. मात्र, त्यावेळी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडून म्हणावा तसा प्रतिसाद आयसीसीला मिळाला नव्हता.
आज जागतिक स्तरावर सर्वाधिक लोकप्रिय खेळ कोणता याचा आढावा घेतला तर फुटबॉल व बास्केटबॉलनंतर क्रिकेटचाच क्रमांक लागतो, त्यामुळे येत्या काळात या खेळाचा ऑलिम्पिकमध्ये निश्चितच समावेश होईल, अशी आशाही आयसीसीने व्यक्त केली आहे.
यापूर्वी 1900 साली पॅरिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला होती. मात्र, अनेक देशांनी त्यांचे संघच उतरवले नसल्याने केवळ एकच सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात ग्रेट ब्रिटन संघाने फ्रान्सचा 158 धावांनी पराभव करत सुवर्णपदक पटकावले होते. आता पॅरिसमधील 2024 किंवा अमेरिकेतील 2028 साली होत असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश व्हावा यासाठी आयसीसीने प्रयत्न सुरू केले आहेत.