जालना – अनैतिक संबधांच्या संशयावरुन विधवा सुनेला आणि तिच्या प्रियकराला सासऱ्याने ट्रॅक्टरखाली चिरडून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार अंबड तालुक्यातील चापडगाव शिवारात घडला आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
मारिया लालझरे आणि भागवत हरबक अशी मृतांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, मागील तीन वर्षांपासून भागवत हरबक आणि मारिया लालझरे यांचे प्रेमसंबंध होते. मारियाचा पती विनोद लालझरे याने दहा वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती.
तर मागील सहा महिन्यांपासून भागवत हरबक आणि मारिया दोघेही एकत्र राहत होते. याचा राग मारियाचे सासरे आणि दीर यांना होता. दोघांचे संबंध अनैतिक असल्याचा राग मनात ठेवून मारीयाचे सासरे बथुवेल लालझरे यांच्या सांगण्यावरुन मुलगा विकास लालझरेने आपल्या मालकीच्या ट्रॅक्टरने मारिया आणि भागवत यांना चिरडले. यात दोघांचाही मृत्यू झाला आहे.
या घटनेनंतर मृत भागवत हरबक यांच्या पत्नीच्या फिर्यादीवरुन मारियाचा सासरा बथुवेल लालझरे आणि मुलगा विकास लालझरे यांच्याविरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.