पुणे – राज्य शासनाच्या गृह विभागामार्फत 2013 मधील विभागीय अर्हता परीक्षेतील उत्तीर्ण हवालदारांना पोलीस उपनिरीक्षक पदावरील बढतीचा निर्णय सात वर्षांनंतर मार्गी लागला.
राज्यातील एक हजार 61 निशस्त्र पोलीस उपनिरीक्षकांचे बढतीची यादी मंगळवारी जाहीर केली. त्यामुळे 2013 मध्ये पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांना पदोन्नती मिळणार असल्याने परीक्षा पास झालेल्या पोलीस हवालदारांना दिवाळीचे गिफ्ट मिळाले आहे.
राज्यात 2013 मध्ये पोलीस महासंचालक यांनी सूचना केल्यानंतर गृहविभागातर्फे खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा घेतली होती. मात्र, या परीक्षेसंदर्भातील प्रकरण “मॅट’मध्ये गेल्यानंतर अनेक वर्षांपासून नियुक्तीचा प्रश्न प्रलंबित होता.
या परीक्षेत उत्तीर्ण अंमलदारांना सेवाज्येष्ठतेनुसार स्थानपन्न पोलीस उपनिरीक्षक पदाचे 25 टक्के कोट्यातील रिक्त जागेत सामावून घेतले जाणार आहे. पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक हे पद गट-ब या अराजपत्रीत दर्जाचे असून पदोन्नतीसाठी पात्र झालेले अंमलदार हे गट-ब पदावर पदोन्नतीने नियुक्त केले जाणार आहेत.
पदोन्नती झालेल्या पोलीस अंमलदारांना पदोन्नतीवर कार्यमुक्त करण्यापूर्वी ते ज्या घटकात पदोन्नतीवर जाणार आहे. त्या घटकप्रमुखांकडे रिक्त पदांची खात्री करूनच त्यांना कार्यमुक्त केले जाणार आहे.
सर्व पदोन्नती प्राप्त अधिकाऱ्यांसाठी 15 दिवसांचा इंडक्शन कोर्स नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकादमीत व पोलीस प्रशिक्षण केंद्र येथे आयोजित केला जाणार आहे. हे प्रशिक्षण पदोन्नती मिळालेल्या सर्वांना करणे बंधनकारक आहे.