बलिया -उत्तरप्रदेशच्या बलियामध्ये पोलीस आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीवेळी दोन गटांत संघर्ष होऊन गोळीबाराची घटना घडली. त्यामध्ये एक व्यक्ती मृत्युमुखी पडली. तो गोळीबार एका भाजप नेत्याने केल्याचा आरोप आहे. त्यावरून वातावरण तापल्यानंतर भाजप नेत्याच्या भावाला अटक करण्यात आली.
रेशन दुकानांचे वाटप करण्यासाठी प्रशासनाने बचत गटांची बैठक बोलावली होती. त्यावेळी दोन गटांमध्ये वाद झाला. त्याचे पर्यवसान दगडफेकीत झाले. त्यावेळी स्थानिक भाजप नेता असणाऱ्या धिरेंद्रप्रताप सिंह याने गोळीबार केल्याचा आरोप आहे. त्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला. घटना घडली त्यावेळी तिथे सुमारे 10 पोलीस उपस्थित होते. गोळीबार करणाऱ्याला पोलिसांनी जाऊ दिल्याचा आरोप विरोधी गटाने केला. त्यामुळे विरोधकांनी उत्तरप्रदेश सरकार आणि सत्तारूढ भाजपवर टीकेची झोड उठवली.
त्यापार्श्वभूमीवर, पोलिसांनी घटनास्थळी उपस्थित असलेल्या धिरेंद्रच्या भावाला अटक केली. पोलीस आता फरार झालेल्या धिरेंद्रच्या मागावर असल्याचे समजते. गोळीबार प्रकरणावरून वादंग निर्माण झाल्यानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांना निलंबित करण्यात आले. दरम्यान, बलियामधील भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी त्यांचा समर्थक असलेल्या धिरेंद्रचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला. धिरेंद्रने स्वत:च्या संरक्षणासाठी गोळीबार केला नसता तर त्याचे कुटूंबीय आणि सहकारी मारले गेले असते, असे आमदार महोदयांनी म्हटले आहे.