सध्या गुंतवणुकीसाठी उत्तम संधी

रिटेल, ई- कॉमर्स आकर्षक क्षेत्रे : उदय कोटक

नवी दिल्ली – करोना व्हायरसमुळे भारतातील विविध कंपन्यांचे बाजारमूल्य कमी पातळीवर गेले आहे. त्यामुळे या कंपन्यांत गुंतवणूक अधिक आकर्षक झाली आहे. देशातील आणि परदेशातील गुंतवणूकदारांसाठी ही योग्य वेळ आहे, असे मत कोटक महिंद्रा बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक उदय कोटक यांनी व्यक्‍त केले आहे.

उदय कोटक हे आशिया खंडातील सर्वात श्रीमंत बॅंकर म्हणून ओळखले जातात. भारतातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत त्यांचे नाव असते. आंतरराष्ट्रीय गुंतवणूकविषयक परिसंवादात बोलताना कोटक म्हणाले की, परिस्थिती अवघड असते त्या वेळी गुंतवणूक केल्यास परिस्थिती सुधारल्यानंतर त्याचा योग्य परतावा मिळू शकतो. त्यामुळे भारतातील सध्याची परिस्थिती गुंतवणूकदारांसाठी सुयोग्य आहे, असे आपल्याला वाटते.

आपल्या दाव्याचे समर्थन करताना कोटक म्हणाले की, भारतामध्ये 50 कोटी लोक इंटरनेटचा वापर करीत आहे. त्यामुळे ई-कॉमर्स आणि डिजिटल पेमेंट यंत्रणा वाढणार आहे. या क्षेत्रात गुंतवणुकीची संधी आहे. करोनामुळे ई-कॉमर्स आणि डिजिटल पेमेंट यंत्रणा अधिक बळकट झाली आहे.

भारतातील रिटेल उद्योग आतिशय वेगाने वाढणार आहे. त्यामुळे भारतातील रिटेल कंपन्यांमध्ये आणि ई-कॉमर्स कंपन्यांमध्ये जगातील अनेक गुंतवणूकदार गेल्या दोन महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करीत असल्याची आठवण त्यांनी करून दिली. भारताने तंत्रज्ञान विकास क्षेत्रावर भर देण्याचे ठरविले आहे. त्यामुळे हे क्षेत्रही गुंतवणुकीसाठी आकर्षक आहे. भारतातील औषधी क्षेत्र जागतिक पातळीवर आघाडीवर आहे. त्यामुळे या क्षेत्रातही गुंतवणूक फलदायी होऊ शकते, असे ते म्हणाले.

अमेरिकेनंतर भारत सुयोग्य

गुंतवणुकीवरील परताव्यासाठी पुढील दहा वर्षात अमेरिकेनंतर भारत सुयोग्य देश ठरेल, असे या परिसंवादात इर वक्‍त्यानी सांगितले. भारताने ज्या आर्थिक सुधारणा केल्या आहेत त्या मुक्त बाजारपेठेला चालना देणाऱ्या आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार दीर्घ पल्ल्याचा विचार करून भारतात गुंतवणूक करू शकतात. करोना व्हायरसच्या काळातही भारतातील शेअरबाजार निर्देशांक बरेच वाढले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.