मुंबई – करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरण्याचे प्रशासनाकडून सातत्याने आवाहन करण्यात येत आहे. मात्र, या नियमांकडे काही नागरिक दुर्लक्ष करत असल्याने मुंबई महापालिकेने कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. मास्क न वापरता कारवाईत अडथळा आणल्या प्रकरणी बीएमसीने एका व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही राज्यातील पहिलीच कारवाई असल्याचे समजते.
प्रथमेश जाधव (वय 28) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. गोवंडी पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मास्क न वापरणे आणि कारवाईत अडथळा आणल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, आतापर्यंत 40 हजार जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती मुंबई पालिकेने दिली आहे. मुंबई महापालिका आणि मुंबई पोलीस यांनी संयुक्त मोहिम राबवून ही कारवाई केली आहे.
करोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईत कोरोनाचा धोका कायम आहे. मात्र काही लोक अजुनही मास्क वापरण्यात कुचराई करत आहेत. अशा लोकांना चाप लावण्यासाठी महापालिकेने दंडाची रक्कम दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. मास्क न घातल्यास आधी 200 रुपये दंड केला जात होता. आता ही रक्कम दुप्पट करण्यात आली असून आता 400 रुपये दंड भरावा लागणार आहे.