अलीकडच्या काळात अनेक सेलिब्रिटी हिरोईनने आपल्याकडे “गुडन्यूज’ असल्याचे सांगितले आहे. करीना कपूर, अनुष्का शर्मा आणि अनिता हंसनंदानी पाठोपाठ आता अमृता रावनेही आपल्याकडे “गुडन्यूज’ असल्याचे संकेत दिले आहेत. अर्थात तिने स्वतः सोशल मीडियावर या संदर्भात कोणतेही स्पष्ट निवेदन दिलेले नाही.
अमृता रावला आपल्या फॅन्सला सरप्राईज द्यायची सवय आहे. तिने आरजे अनमोलबरोबर लग्न केले होते, तेंव्हाही या लग्नाची घोषणा तिने अशीच अचानक केली होती. अनमोलने 2009 मध्ये अमृताचा इंटरव्ह्यू घेतला होता. त्यानंतर त्यांच्यातील लव्हस्टोरी सुरू झाली होती आणि 2016 मध्ये दोघांनी लग्न केले होते. आता अनमोल आणि अमृताच्या घरी एक छोटा पाहुणा लवकरच येणार असल्याची माहिती मिळते आहे.
अमृताने हा अनुभव आपल्यासाठी खूपच आनंददायक असल्याचे तिच्या जवळच्या नातेवाईकांना सांगितले आहे. लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वीच अमृताला या गुडन्यूजचे संकेत मिळाले होते. आता तर घरी नवीन पाहुणा येण्याची वेळ देखील जवळ आली आहे.
पण ही गुडन्यूज अनमोल आणि अमृताने अजूनपर्यंत फॅन्सना सांगितलेली नाही. कारण आपल्या घरातील काही खासगी गोष्टी घरातच रहाव्यात असे या दोघांनाही वाटते. मात्र गॉसिप गॅंगला या न्यूजचा पत्ता लागलाच. आता जेंव्हा अमृताच्या डिलीव्हरीची बातमी समजेल, तेंव्हा तरी त्याची औपचारिक घोषणा होईलच.